सत्ताधाऱ्यांचे राजकारण : चुकून आलेले उपमहापौरही सटकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 01:22 AM2020-02-28T01:22:10+5:302020-02-28T01:24:45+5:30
भाजपचे गटनेते अजित ठाणेकर यांच्या कक्षात महाडिक यांची भेट घेतली; परंतु सत्तारूढ आघाडीचे पदाधिकारी, नगरसेवक कार्यक्रमास नाहीत हे लक्षात येताच मोहिते यांनी तेथून धूम ठोकली. बोलत-बोलतच ते महापालिका चौकातून निघून गेले. या बहिष्कार नाट्याचीच जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली.
कोल्हापूर : महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी यांच्या कार्यालय प्रवेशाच्या कार्यक्रमावर महापौर निलोफर आजरेकर यांच्यासह सत्तारूढ कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी बहिष्कार टाकला. हा कार्यक्रम भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते पार पडला. या बहिष्कार नाट्यामुळे महापालिका वर्तुळात राजकीय चर्चा सुरू झाली.
महापालिकेतील विरोधी पक्षनेते म्हणून भाजपचे नगरसेवक विजय सूर्यवंशी यांची नुकतीच निवड झाली. कार्यालय अद्ययावत झाल्यानंतर गुरुवारी सकाळी ११ वाजता त्यांचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, देवस्थानचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या उपस्थितीत महापौर निलोफर आजरेकर यांच्या हस्ते कार्यालय प्रवेशाचा कार्यक्रम निश्चित झाला होता.
विधिमंडळ अधिवेशन सुरू असल्यामुळे प्रदेशाध्यक्ष पाटील आले नाहीत. अमल महाडिकही आले नाहीत; त्यामुळे महापौर आजरेकर व धनंजय महाडिक यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार होता; परंतु महापौर आजरेकर, सत्ताधारी आघाडीच्या सर्वच पदाधिका-यांनी कार्यक्रमास दांडी मारली. उपमहापौर संजय मोहिते यांनी भाजपचे गटनेते अजित ठाणेकर यांच्या कक्षात महाडिक यांची भेट घेतली; परंतु सत्तारूढ आघाडीचे पदाधिकारी, नगरसेवक कार्यक्रमास नाहीत हे लक्षात येताच मोहिते यांनी तेथून धूम ठोकली. बोलत-बोलतच ते महापालिका चौकातून निघून गेले. या बहिष्कार नाट्याचीच जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली.
यामुळे घेतला बहिष्काराचा निर्णय
गृहराज्यमंत्री सतेज पाटील व धनंजय महाडिक यांचे राजकीय वैर सर्वांनाच माहीत आहे. चंद्रकांत पाटील हेदेखील राजकीय विरोधकच! तरीही या दोघांना महापालिकेतील कार्यक्रमास निमंत्रण दिल्यामुळे विरोधकांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतला.