जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:46 PM2020-12-11T16:46:44+5:302020-12-11T16:49:20+5:30
GramPanchyatSamiti, Election, collector, kolhapur अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या ४३३ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. येत्या मंगळवारी (दि.१५) तहसिलदार यांच्याकडून निवडणूक नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार असून या दिवसापासून आचारसंहिता लागू होईल. मतमोजणी १८ जानेवारीला होणार आहे. आता निवडणूकीचे बिगूल वाजल्याने गावागावामधील राजकारण तापणार आहे.
कोल्हापूर : अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या ४३३ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. येत्या मंगळवारी (दि.१५) तहसिलदार यांच्याकडून निवडणूक नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार असून या दिवसापासून आचारसंहिता लागू होईल. मतमोजणी १८ जानेवारीला होणार आहे. आता निवडणूकीचे बिगूल वाजल्याने गावागावामधील राजकारण तापणार आहे.
जिल्ह्यातील एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या ४३३ ग्रामपंचायतींची निवडणूक कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रक्रियेला वेग आला आहे.
सोमवारी (दि. १४) अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दरम्यान शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मंगळवारी (दि.१५) तहसिलदार यांच्याकडून निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात येणात असून या दिवसापासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संगणकप्रणालीद्वारेच होणार आहे.
निवडणूक कार्यक्रम असा
- निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे : १५ डिसेंबर
- उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत : २३ ते ३० डिसेंबर
- उमेदवारी अर्जांची छाननी : ३१ डिसेंबर
- उमेदवारी अर्ज माघार व चिन्ह वाटप : ४ जानेवारी
- मतदान : १५ जानेवारी (सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच)
- मतमोजणी : १८ जानेवारी
- निवडणुक निकालाची अधिसुचना प्रसिद्धी : २१ जानेवारीपर्यंत