बेळगावातील जिल्हा, तालुका पंचायतीसाठी उद्या मतदान

By admin | Published: February 11, 2016 10:54 PM2016-02-11T22:54:05+5:302016-02-11T23:42:59+5:30

राष्ट्रीय पक्षांची कसोटी : महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी प्रतिष्ठेची निवडणूक

Polling for Belgaum district, taluka panchayat tomorrow | बेळगावातील जिल्हा, तालुका पंचायतीसाठी उद्या मतदान

बेळगावातील जिल्हा, तालुका पंचायतीसाठी उद्या मतदान

Next

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुकीच्या जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकांचे प्राबल्य असणाऱ्या भागात आपले उमेदवार निवडून आणणे प्रतिष्ठेचे केले आहे. सध्याचे वातावरण पाहता समिती खानापूर आणि बेळगाव तालुक्यात बाजी मारेल असे दिसते. जिल्ह्यातील तालुका पंचायतीच्या ३४५, तर जिल्हा पंचायतीच्या ९० जागांसाठी उद्या, शनिवारी मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा, पोलीस सज्ज झाले आहेत.
या निवडणुकीत सर्वच राष्ट्रीय पक्षांनी मतासाठी थैल्या सैल सोडल्या आहेत. मतदारांंना प्रलोभने दाखवून प्रसंगी धाकधपटशा दाखवून मराठी भाषिकांची मते आपल्या पक्षालाच मिळवीत या दृष्टीने त्यांची धडपड सुरू आहे. कन्नडिगांची बाजू घेणारे पोलीसही प्रचाराच्या दरम्यान भलते सलते आक्षेप घेऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांनी आपली ताकद लावली आहे. इस्लामपूरचे आमदार जयंत पाटील यांनी खानापूर येथील नंदगड, बेळगावातील कडोली बेळगुंदी, सीमा आंदोलनाच्या अस्मितेचे केंद्रबिदू असलेल्या येळ्ळूर गावात जाहीर सभा घेतल्या, तर एकीकरण समितीच्या उमेदवारांसाठी उस्मानाबादचे शिवसेनेचे खासदार प्रा. रवी गायकवाड यांनी मुतगा, किनाये येथे जाहीर सभा घेतल्या. या दोन्हीही नेत्यांनी एकीकरण समितीलाच मतदान करा, असे आवाहन मराठी भाषिक मतदारांना केले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अलीकडील आंदोलनात तरुण पिढीचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून आला आहे. त्यावरून बेळगाव आणि खानापूर तालुका पंचायतीवर एकीकरण समितीचा झेंडा फडकेल, असे वातावरण आहे.
येळ्ळूर जिल्हा पंचायत मतदारसंघात अर्जुन गोरलसारख्या अनुभवी नेत्याला एकीकरण समितीने तिकीट दिले आहे. येळ्ळूर गावाच्या वेशीवर डौलाने फडकत असलेला महाराष्ट्र राज्य फलक २७ जुलैला कर्नाटक सरकारने अन्यायाने काढला. यावेळी कानडी पोलिसांचा लाठी हल्ला सहन केलेल्या नेत्यालाच एकीकरण समितीने तिकीट दिले आहे. त्यामुळे कर्नाटक प्रशासन आणि सरकारच्या विरोधातील सूर दरवेळेप्र्रमाणे मतदानात प्रकट होणार आहे. जे येळ्ळूर गावात पेरल जातंय ते सीमाभागात उगवलं जातंय, अशी भावना आहे. त्यामुळे येळ्ळूरमधला मराठी माणूस आणि एकीकरण समितीची लहर संपूर्ण सीमा भागात उमटत आहे असेच चित्र सध्या तरी दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणुकीत मराठी माणसाला घवघवीत यश मिळेल, अशी खात्री राजकीय विश्लेषक देताना दिसत आहेत .
महाराष्ट्र एकीकरण समितीत पूर्वीपासूनच दुही आहे. मात्र, त्याचा फटका यंदाच्या निवडणुकीत मराठी माणसाला फारसा जाणवणार नाही. राष्ट्रीय पक्षांच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास मागील वेळेस बेळगाव तालुका आणि जिल्हा पंचायतीवर भाजपचे वर्चस्व होते. मात्र, गेल्या पाच वर्षांत तालुका आणि जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून भाजपने म्हणावा तेवढा जनसंपर्क ठेवला नाही. या नाराजीचा फटका भाजपला बसू शकतो. भाजप आणि काँग्रेसच्या लढाईत बेळगाव आणि खानापूर तालुक्यात मराठी माणसाचं नेतृत्व करणारी एकीकरण समिती बाजी मारेल यात शंका नाही.


समितीची कसोटी
बेळगाव तालुका पंचायतीत एकूण ४५ सदस्य आहेत. त्यापैकी मराठीबहुल ३२ ठिकाणी, तर खानापूर तालुक्यातील एकूण २५ पैकी २० ठिकाणी एकीकरण समिती निवडणूक लढवत आहे. बेळगाव जिल्ह्णातील जिल्हा पंचायतीच्या एकूण ९० जागांपैकी बेळगावमधील १२ पैकी १०, तर खानापूरमध्ये एकूण सहापैकी ५ जागांवर एकीकरण समिती निवडणूक लढवत आहे. जिल्हा पंचायतीच्या दृष्टिकोनातून बेळगाव आणि खानापूर तालुक्यांतील एकूण १८ जागांपैकी दहा जागांवर जरी एकीकरण समितीचे उमेदवार निवडून आले तरी ते किंगमेकरची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांनी निवडणुकीचे मैदान एकतर्फी मारण्यासाठी कंबर कसली आहे. भाजपने आपल्या राज्य आणि केंद्रीय पातळीवरील नेत्यांना तालुका, जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी आणले होते.


तालुका पंचायतीच्या ३४५, तर जिल्हा पंचायतीच्या ९० जागा
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांची ताकद
येळ्ळूरमध्ये कानडी पोलिसांचा लाठी हल्ला सहन केलेल्या अर्जुन गोरलसारख्या अनुभवी नेत्याला समितीने तिकीट दिले आहे.

Web Title: Polling for Belgaum district, taluka panchayat tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.