फोडणी महागली; भाजीपाला आवाक्यात

By admin | Published: August 22, 2016 12:29 AM2016-08-22T00:29:09+5:302016-08-22T00:29:09+5:30

बाजारभाव : तूरडाळीची घसरण सुरू

Polling expensive; Vegetable outdoors | फोडणी महागली; भाजीपाला आवाक्यात

फोडणी महागली; भाजीपाला आवाक्यात

Next

कोल्हापूर : तेलाची मागणी वाढल्याने ऐन सणात किलोमागे दोन रुपयांची वाढ झाल्याने तेलाने ग्राहकांचा चांगलाच झटका दिला आहे. भाजीपाल्याची आवक वाढल्याने दर कमालीचे कमी झाले आहेत. तूरडाळीच्या दरात घसरण सुरू झाली असून किलोमागे तब्बल दहा रुपयांनी दर कमी झाला आहे. फळबाजारातील आवक व मागणी सारखीच असल्याने फारशी चढउतार दिसत नाही.
साखर ४० रुपयांवर स्थिर राहिली आहे. हरभराडाळ, मूग, मूगडाळ, मटकीच्या दरांत फारसा चढउतार दिसत नाही. शाबूची मागणी वाढली असली तरी ६० रुपयांवर स्थिर राहिली आहे. तूरडाळीच्या दरात घसरण सुरू झाली असून किरकोळ बाजारात १४० रुपयांपर्यंत डाळ आली आहे.
भाजीपाला बाजारात फळे व पालेभाज्यांची आवक वाढली आहे. कोबी, टोमॅटो, श्रावण घेवडा, ढबू, गवार, कारली, भेंडी, वरणा, दोडका या भाज्यांच्या दरांत घसरण झाली आहे. वांग्यांचे दर मात्र स्थिर असून पांढरी वांगी ४० ते ६० रुपयांपर्यंत पोहोचली आहेत. कोंथिबिरीची आवक वाढूनही दर तेजीत आहेत.
गूळ ५५ रुपयांवर!
किरकोळ बाजारात गुळाचा दर ५५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ऐन गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर गुळाची मागणी अधिक असते. मागणी वाढण्यापूर्वीच गूळ भडकल्याने ऐन सणात गुळाचा साठ रुपयांचा टप्पा पार होईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
कांदा-बटाटा स्थिर
गत आठवड्याच्या तुलनेत कांदा व बटाट्याच्या दरांत फारसा चढउतार दिसत नाही. घाऊक बाजारात कांदा साडेसात, बटाटा १८, तर लसूण ९० रुपये प्रतिकिलो असा दर आहे.
घाऊक बाजारातील प्रमुख भाज्यांचे प्रतिकिलोचे दर असे
कोबी- ६, वांगी- ३०, टोमॅटो- ८, ढबू- ३०, घेवडा- १२, गवार- १८, ओला वाटाणा- ५५, कारली- ३५, वरणा- २२, दोडका- १५.

झोपडपट्टीवासीयांसाठी ‘पंतप्रधान आवास’चा प्रस्ताव
इचलकरंजी नगरपालिका : लाभार्थ्यांची बैठक घेणार - सदा मलाबादे
इचलकरंजी : शहरामधील नेहरूनगर झोपडपट्टीमधील लाभार्थ्यांसाठी नगरपालिकेकडे निधी उपलब्ध नसल्याने त्यांचा समावेश पंतप्रधान आवास योजनेत करण्यात यावा, अशा आशयाचा प्रस्ताव नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी लालबावटा झोपडपट्टी संघटनेसमोर ठेवला आहे. हा प्रस्ताव नेहरूनरमधील लाभार्थ्यांसमोर ठेवून त्यांची बैठक घेण्यात येईल, असे संघटनेचे अध्यक्ष सदा मलाबादे यांनी यावेळी सांगितले.
नेहरूनगर झोपडपट्टीमध्ये सुमारे ६३६ झोपड्या आहेत. त्यापैकी ४४४ लाभार्थ्यांनी अपार्टमेंट पद्धतीने घरकुले मिळावीत, यासाठी त्यांच्या हिश्श्याची रक्कम नगरपालिकेकडे जमा केली आहे. त्यापैकी फक्त ४८ घरकुले असणारी एकच इमारत बांधून तयार झाली आहे. परिणामी राजकीयदृष्ट्या रखडलेल्या या घरकुलांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. लाभार्थी मात्र घरकुलांसाठी झोपडपट्टीची जागा रिकामी करून अन्यत्र भाड्याने राहत आहेत. तरी लाभार्थ्यांना तातडीने घरकुले बांधून द्यावीत; अन्यथा लालबावटा झोपडपट्टी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला.
याबाबत नगराध्यक्षा बिरंजे, मुख्याधिकारी डॉ. रसाळ, संघटनेचे अध्यक्ष सदा मलाबादे, शिवगोंड खोत, नगरसेवक विठ्ठल चोपडे, नगर अभियंता बापूसाहेब चौधरी, अभियंता संजय बागडे, आदींची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेत घरकुलांसाठी आवश्यक असलेला ७ कोटी ६० लाखांचा वाढीव निधी पालिकेकडे उपलब्ध नाही, अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांनी दिली. त्यामुळे लाभार्थ्यांनी पंतप्रधान आवास योजनेमध्ये सहभागी व्हावे, असा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यावर बोलताना मलाबादे यांनी सर्व लाभार्थी झोपडपट्टीवासीयांची बैठक घेऊन या बैठकीत या नव्या प्रस्तावाबाबत विचार करण्यात येईल, असे सांगितले.

 

Web Title: Polling expensive; Vegetable outdoors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.