कोल्हापूर जिल्ह्यातील सहा नगरपालिकांचा बिगुल वाजला, सत्तांतरानंतरची पहिलीच रणधुमाळी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 12:13 PM2022-07-09T12:13:58+5:302022-07-09T12:14:48+5:30
राज्यात गेल्याच आठवड्यात सत्तांतर होऊन शिवसेनेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट भाजपच्या मदतीने सत्तेवर आला आहे. त्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने शिवसेनेसह दोन्ही काँग्रेस व भाजपचीही कसोटी पाहणारी ही निवडणूक होणार आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यातील कमी पाऊस असलेल्या भागातील ६ नगर पालिकांसाठी १८ ऑगस्टला मतदान व १९ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी सायंकाळी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. कागल, जयसिंगपूर, गडहिंग्लज, कुरुंदवाड, मुरगुड, पेठवडगाव या पाच नगर पालिकांसाठी शुक्रवारपासूनच आचारसंहिता लागू झाली.
इचलकरंजी महापालिका झाल्याने व तसेच मलकापूर व पन्हाळा या दोन नगर पालिकांची निवडणूक नंतर होणार आहे. निवडणूक जाहीर झाल्याने आता त्या-त्या नगरपालिकेचे राजकारण पावसाळ्यातच उसळी घेणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील नगरपालिका, नगर परिषदा व नगरपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून अंतिम मतदारयादी याआधीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदान केंद्रांची यादी शनिवार, ९ जुलै रोजी जाहीर केली जाणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता शुक्रवारपासूनच लागू झाली असून ती नगर परिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रासाठी लागू राहील.
प्रभागरचना, आरक्षण सोडत व मतदारयादीबाबत याचिका सुरू असल्यास न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असणार आहे. या निवडणूक कालावधी दरम्यान कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी, पूर अशी नैसर्गिक आपत्ती आली तर त्याचा अहवाल तातडीने आयोगाला सादर करावा, अशी सूचनादेखील संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
निवडणुकीचा टप्पा व तारीख
निवडणूक कार्यक्रम जाहीर : २० जुलै
उमेदवारी अर्ज सादर : २२ ते २८ जुलै सकाळी ११ ते दुपारी ३ (२३ व २४ जुलै हे सुट्टीचे दिवस वगळून)
उमेदवारी अर्जांची छाननी व अंतिम यादी प्रसिद्ध : २९ जुलै
अर्ज माघार : ४ ऑगस्ट (अपिल असल्यास निकालानंतर मात्र ८ ऑगस्टच्या आधी)
अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध : माघारीनंतरच्या दुसऱ्या दिवशी
मतदान : १८ ऑगस्ट सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच
मतमोजणी : १९ ऑगस्ट सकाळी १० वाजल्यापासून.
पुराची शक्यता तरीही निवडणूक कशी...
राज्य निवडणूक आयोगाने जून महिन्यात राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाच्या स्थितीचा वस्तुदर्शक अहवाल मागितला होता. कोल्हापुरात गेली तीन वर्षे सलग पूर येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पाठवलेल्या अहवालात केंद्रात अतिवृष्टी होऊन एकापेक्षा जास्त वेळा पुराची शक्यता असल्याचे नमूद केले होते. तरीही आयोगाने निवडणूक कशी जाहीर केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नगरपालिका : सध्या कुणाची होती सत्ता
कागल : राष्ट्रवादी-अपक्ष आघाडी
गडहिंग्लज : जनता दल
जयसिंगपूर : काँग्रेस-राष्ट्रवादी (यड्रावकर-सा.रे. पाटील गट)
पेठवडगाव : युवक क्रांती आघाडी
मुरगूड : मंडलिक गट
कुरुंदवाड : काँग्रेस-राष्ट्रवादी
सत्तांतरानंतरची पहिलीच कुस्ती...
राज्यात गेल्याच आठवड्यात सत्तांतर होऊन शिवसेनेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट भाजपच्या मदतीने सत्तेवर आला आहे. या सरकारमध्ये भाजप सहभागी आहे. त्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने शिवसेनेसह दोन्ही काँग्रेस व भाजपचीही कसोटी पाहणारी ही निवडणूक होणार आहे.