LokSabha2024: मतदान केंद्रांवर मोबाइल बंदी, कोल्हापुरात चोख पोलिस बंदोबस्तात शांततेत मतदान
By उद्धव गोडसे | Published: May 7, 2024 12:08 PM2024-05-07T12:08:04+5:302024-05-07T12:08:12+5:30
राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठिकाणी विशेष खबरदारी
कोल्हापूर : कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघातील ४०१६ मतदान केंद्रांवर पोलिसांच्या चोख बंदोबस्तात मतदानाला सुरुवात झाली. मतदानाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होऊन गोपनीयतेचा भंग होऊ नये, यासाठी मतदान केंद्रात मोबाइल घेऊन जाण्यास बंदी घातली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्व केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त तैनात असून, राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या गावांमध्ये अतिरिक्त बंदोबस्त तैनात आहे. मतदान केंद्र आणि १०० मीटर परिसरात पोलिसांची करडी नजर आहे.
मतदानाला सुरुवात होऊन चार तास उलटले असून, सकाळपासूनच अनेक ठिकाणी मतदारांनी रांगा लावून मतदानाचा हक्क बजावला. हुल्लडबाजांनी मतदान केंद्रांवर गोंधळ घालू नये, यासाठी पाच हजार पोलिस, तीन हजार होमगार्ड, केंद्रीय राखीव दलाच्या तीन तुकड्या, राज्य राखीव पोलिसांच्या पाच तुकड्या तैनात आहेत.
काही मतदार मतदान प्रक्रियेचे फोटो किंवा व्हिडिओ काढून सोशल मीडियात व्हायरल करतात. असे प्रकार घडू नयेत, यासाठी मतदान केंद्रात मोबाइल घेऊन जाण्यास मतदारांना बंदी घालण्यात आली आहे. याची कोटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिका-यांनी दिल्या आहेत.