कोल्हापूर महापालिकेच्या दोन प्रभागांसाठी २३ जून रोजी मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 02:22 PM2019-05-25T14:22:38+5:302019-05-25T14:24:36+5:30
महानगरपालिका प्रभाग क्रमांक २८-सिद्धार्थनगर व प्रभाग क्रमांक ५५-पद्माराजे उद्यान येथील रिक्तपदासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महानगरपालिका प्रशासनाने शुक्रवारी जाहीर केला. या दोन्ही प्रभागांत २३ जून रोजी मतदान होणार असून, उमेदवारी अर्ज भरण्यास ३० मे पासून सुरुवात होत आहे. दरम्यान, या दोन प्रभागांकरिता शुक्रवारी सायंकाळपासूनच आचारसंहिता लागू
कोल्हापूर : महानगरपालिका प्रभाग क्रमांक २८-सिद्धार्थनगर व प्रभाग क्रमांक ५५-पद्माराजे उद्यान येथील रिक्तपदासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महानगरपालिका प्रशासनाने शुक्रवारी जाहीर केला. या दोन्ही प्रभागांत २३ जून रोजी मतदान होणार असून, उमेदवारी अर्ज भरण्यास ३० मे पासून सुरुवात होत आहे. दरम्यान, या दोन प्रभागांकरिता शुक्रवारी सायंकाळपासूनच आचारसंहिता लागू झाली.
राष्टÑवादी कॉँग्रेसचे नगरसेवक अफजल पीरजादे व अजिंक्य चव्हाण यांनी स्थायी समिती सभापती निवडणुकीत पक्षाचा आदेश डावलून भाजपच्या उमेदवारास मतदान केल्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत कारवाई म्हणून त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले होते; त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने ही पोटनिवडणूक जाहीर केली.
महानगरपालिका आयुक्तडॉ. मल्लिनाथ कलशेट्टी ३० मे रोजी निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना जाहीर करतील. याच दिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होईल. उमेदवारी अर्ज भरण्याची ही प्रक्रिया सहा जूनअखेर चालणार आहे. २३ जून रोजी दोन प्रभागांसाठी मतदान होईल, तर लगेचच दुसरे दिवशी म्हणजे २४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.
निवडणुकीची आचारसंहिता शुक्रवारपासून लागू झाली असून, ती निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. आचारसंहिता निवडणूक होणाऱ्या संबंधित प्रभागातच लागू राहील, मात्र या प्रभागातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा कोणत्याही मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक किंवा इतर पदाधिकाऱ्यांना करता येणार नाही.
प्रभागातील हालचाली गतिमान
निवडणूक जाहीर झाल्यामुळे सिद्धार्थनगर आणि पद्माराजे उद्यान प्रभागातील राजकीय हालचाली आता गतिमान होतील. पद्माराजे उद्यान येथे माजी नगरसेवक अजित राऊत आणि माजी उपमहापौर विक्रम जरग यांचे चिरंजीव अक्षय जरग यांच्यात होण्याची शक्यता आहे. मागच्यावेळी जरग यांनी ताराराणी आघाडीकडून निवडणूक लढविली होती. आता आमदार सतेज पाटील सांगतील त्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल, असे जरग यांनी सांगितले. सिद्धार्थनगरातून शिवसेनेच्या तेजस्विनी घोरपडे, कॉँग्रेसचे जय पटकारे, धनंजय सावंत, विलास केसरकर, सुशील भांदिगरे असे मान्यवर निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. पक्ष म्हणून कॉँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेना व भाजप यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगण्यात आले. दोन-चार दिवसांत राजकीय पक्षांची भूमिका ठरणार आहे.
असा असेल निवडणूक कार्यक्रम -
- निवडणुकीची अधिसूचना-३० मे
- उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात - ३० मे पासून
- उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी-३० मे ते ६ जून
- उमेदवारी अर्जांची छाननी-७ जून
- उमेदवारी मागे घेण्याची मुदत-१० जूनपर्यंत
- निवडणूक चिन्हांचे वाटप- ११ जून
- मतदान-२३ जून
- मतमोजणी-२४ जून