Gram Panchayat Election: कोल्हापुरात सोमवारपासून रणधुमाळी; १९७७ केंद्रांवर होणार मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 12:36 PM2022-11-26T12:36:51+5:302022-11-26T12:38:59+5:30
जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान आणि २० डिसेंबरला मतमोजणी होणार
कोल्हापूर : जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १ हजार ९७७ केंद्रांवर मतदान होणार असून, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे की नाही हे पाहण्यासाठी जिल्ह्यातील अपर जिल्हाधिकारी संवर्गातील ९ अधिकाऱ्यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदानासाठी अपेक्षित बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. निवडणुकीची तारीख जवळ येत आहे तसा प्रशासनाच्या तयारीलाही वेग आला आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवार (दि.२८)पासून सुरू होत आहे.
जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान आणि २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यासाठी एकीकडे उमेदवारांची घाई सुरू असली तरी दुसरीकडे ही प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी असलेले जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायत विभागातही प्रशासकीय तयारीला वेग आला आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनातील ९ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे (शाहूवाडी), विवेक काळे (चंदगड), उपविभागीय अधिकारी करवीर वैभव नावडकर (करवीर, गगनबावडा) सुशांतकिरण बनसोडे (राधानगरी, कागल), वसुंधरा बारवे (भुदरगड, आजरा), बाबासाहेब वाघमोडे (गडहिंग्लज), भैरप्पा माळी (पन्हाळा), विकास खरात (इचलकरंजी), जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे (शिरोळ) हे अधिकारी निरीक्षक म्हणून काम पाहतील.
मतदानासाठी लागणारे बॅलेट युनिट व कंट्रोल युनिक पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याने ते मागविण्याची गरज नाही; पण निवडणुकीसाठी लागणाऱ्या पांढऱ्या मेमरी, मार्कर पेन, पेपरसील, पट्टीसील, स्पेशन टॅग या साहित्याची निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली आहे.
- ग्रामपंचायतींची संख्या : ४७२
- प्रभाग संख्या : १ हजार ६५०
- सदस्य संख्या : ४ हजार ४०२
- सरपंच : ४७४
- मतदानासाठी लागणारे बॅलेट युनिट : २ हजार ५७०
- मतदानासाठी लागणारे कंट्रोल युनिट : २ हजार २७५