'या' ११ पैकी एक ओळखपत्र असेल तर करता येणार मतदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 05:43 PM2019-04-16T17:43:14+5:302019-04-17T12:32:03+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. २३) जिल्ह्यात मतदान होत आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांनी वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र सोबत घेऊन
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी ( २३ एप्रिल) जिल्ह्यात मतदान होत आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांनी वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र सोबत घेऊन जावे किंवा मतदाराकडे छायाचित्र असलेले मतदान ओळखपत्र नसल्यासही मतदार मतदान करू शकतात. त्यासाठी विविध अकरा प्रकारची कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत, मात्र त्यासाठी मतदार यादीत नाव असणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने ग्राह्य केलेल्या अकरा कागदपत्रांमध्ये पारपत्र (पासपोर्ट), वाहनचालक परवाना, केंद्र /राज्य शासन/ सार्वजनिक उपक्रम/ सार्वजनिक मर्यादित कंपनी यांचे फोटो असलेले ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँक पासबुक, पॅनकार्ड, एनपीआर अंतर्गत आरजीआयद्वारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत देण्यात आलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तिवेतन कागदपत्र आणि खासदार, आमदार व विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड ही कागदपत्रे मतदारांना मतदान केंद्रांवर ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी देसाई यांनी स्पष्ट केले.
केवळ मतदार छायाचित्र ओळखपत्र आहे म्हणून मतदान करता येईल असे नाही तर मतदार यादीत आपले नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे. नावनोंदणी अथवा पडताळणीसाठी https://eci.gov.in/voter/voter/ या वेबसाईटला भेट द्या. मतदान केंद्रावर केवळ छायाचित्र मतदार पावती ही ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही तर त्यासोबत मतदार छायाचित्र ओळखपत्र किंवा वरील अकरा ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच प्रवासी भारतीय मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा केवळ मूळ पासपोर्ट आवश्यक राहील, असेही जिल्हाधिकारी देसाई यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.