प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना स्वाभिमानीने धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:22 AM2021-02-08T04:22:20+5:302021-02-08T04:22:20+5:30

पंचगंगा नदीतील दूषित पाण्याची पाहणी करण्यास रात्री आल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना तेरवाड बंधाऱ्यावर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी चांगलेच ...

Pollution board officials were caught red-handed | प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना स्वाभिमानीने धरले धारेवर

प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना स्वाभिमानीने धरले धारेवर

Next

पंचगंगा नदीतील दूषित पाण्याची पाहणी करण्यास रात्री आल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना तेरवाड बंधाऱ्यावर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी चांगलेच धारेवर धरले. अखेर नदीपात्रातील जलपर्णी आज सोमवारी जेसीबी मशीनच्या साहाय्याने काढण्याचे व पाणी दूषित करणाऱ्याचा शोध घेऊन त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले. कार्यकर्यांच्या मदतीनेच पाण्याचे नमुने घेत अधिकाऱ्यांनी बंधाऱ्यावरून काढता पाय घेतला.

गेल्या चार दिवसांपासून नदीपात्रात दूषित पाणी येत आहेत. या पाण्यामुळे मासे मृत होऊन नदीपात्रात तरंगत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत होता. त्यामुळे दूषित पाण्याचे नमुने घेण्यासाठी रविवारी रात्री सातच्या सुमारास प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड व क्षेत्र अधिकारी सचिन हरबट प्रथम शिरोळ बंधारा व नंतर तेरवाड बंधाऱ्यावर आले.

दूषित पाण्याचे नमुने घेण्यासाठी अधिकारी रात्री आल्याचे समजताच स्वाभिमानी कार्यकर्ते व शेतकरी तेरवाड बंधाऱ्यावर जमा झाले. दूषित पाणी अंधारात काय ओळखणार, रात्रीच्या वेळी पंचनामा काय करणार? असा अनेक प्रश्नांचा भडिमार करून कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी प्रादेशिक अधिकारी गायकवाड यांनी संयमाची भूमिका घेत जलपर्णी हटविण्यासाठी सोमवारी इंचलकरंजी नगरपालिकेच्या जेसीबी मशीनच्या साहाय्याने जलपर्णी हटविण्यात येईल व नदी प्रदूषित कोणामुळे झाली, याचा शोध घेऊन त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

स्वाभिमानी कार्यकर्त्यांनीही समजूतदारपणा दाखवत अधिकाऱ्यांना पाण्याचे नमुने घेण्यास मदत करत त्यांची सुटका केली. यावेळी स्वाभिमानी युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील, विश्वास बालीघाटे, बंडू उमडाळे, शिवाजी रोडे, योगेश जीवाजे, रघू नाईक आदी उपस्थित होते.

फोटो ओळ - तेरवाड, ता. शिरोळ बंधाऱ्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी धारेवर धरले.

Web Title: Pollution board officials were caught red-handed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.