प्रदूषण नियंत्रण मंडळ कागदोपत्रीच
By Admin | Published: March 27, 2015 10:35 PM2015-03-27T22:35:23+5:302015-03-28T00:05:44+5:30
उच्च न्यायालयाचे ताशेरे; आवश्यक सदस्यांची नियुक्तीच नसल्याचे उघड
कोल्हापूर : राज्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ फक्त कागदोपत्रीच कार्यरत असल्याची गंभीर बाब शुक्रवारी पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयात उघडकीस आली. जलप्रदूषण प्रतिबंध कायद्यांतर्गत प्रदूषण नियंत्रण मंडळावर आवश्यक सदस्यांची नियुक्तीच अद्याप केलेली नाही. त्यामुळे संतप्त न्यायालयाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे प्रभावहीन झाल्याचे ताशेरे ओढले.प्रदूषण मंडळाने आवश्यक सदस्यांच्या पूर्णवेळ नियुक्त्या किती कालावधीत करणार हे स्पष्ट करावे, असा आदेश राज्य शासनाला दिला. दरम्यान, पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी होणार आहे. पंचगंगा प्रदूषण मुक्तीसंदर्भात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. एच. पाटील व न्या. ए. व्ही. अचलिया यांच्या खंडपीठासमोर इचलकरंजी येथील दत्ता माने व सदा मलाबादे यांनी वकील धैर्यशील सुतार यांच्यातर्फे दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली.गेल्या ५ ते १० वर्षांत प्रदूषण मंडळाने पंचगंगा खोऱ्यातील प्रदूषण करणारे साखर कारखाने व इतर औद्योगिक आस्थापनांवर ‘बंद’ची कारवाई केली नाही, असे याचिकाकर्त्यांचे वकील सुतार यांनी निदर्शनाला आणून दिले. त्यावर प्रदूषण मंडळाच्या वकिलांनी बँक हमी जप्त करणे व फौजदारी करण्याच्या कारवाया प्रस्तावित केल्याचे निदर्शनाला आणून दिले; पण अशा कारवायांना लोक घाबरत नाहीत व कारागृहात जाण्यासही असे कारखानदार घाबरत नसल्याची टिप्पणी खंडपीठाने केली. ‘बंद’ची कारवाई कधी केली का, असा प्रश्न न्यायालयाने केला.यावर नुकतीच संबंधित साखर कारखान्यांसहित इतर औद्योगिक आस्थापनांना ‘बंद का करू नये,’ अशी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. सुनावणीसुद्धा झाली आहे. लवकरच कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वकिलांनी सांगितले. दरम्यान, सध्या पर्यावरण खात्याचे सचिवच मंडळाचे प्रभारी अध्यक्ष म्हणून काम पाहतात. पाच विविध खात्यांच्या प्रधान सचिवांची नियुक्ती आहे. महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळ व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचा प्रत्येकी एक सदस्य आहे; परंतु इतर कोणत्याही पदांची नियुक्ती मंडळावर झाली नसल्याचे सुनावणीदरम्यान उघड झाले.
काही दिवसांत काम पूर्ण
कोल्हापूर महापालिकेचा ७६ दशलक्ष लिटरचा सांडपाणी प्रकल्प पूर्ण झाला आहे. मात्र, निर्गतीच्या पाईपलाईनपैकी २०० मीटरचे काम अपूर्ण आहे. तेसुद्धा प्रगतिपथावर आहे. येत्या काही दिवसांत हे काम पूर्ण होईल, असे महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले.