प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याला घातले बांधून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:22 AM2020-12-24T04:22:58+5:302020-12-24T04:22:58+5:30
कुरुंदवाड : प्रदूषित पाण्यामुळे पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधाऱ्यावर मृत माशांचा पंचनामा, तसेच दूषित पाण्याची पाहणी करण्यासाठी आलेल्या प्रदूषण नियंत्रण ...
कुरुंदवाड : प्रदूषित पाण्यामुळे पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधाऱ्यावर मृत माशांचा पंचनामा, तसेच दूषित पाण्याची पाहणी करण्यासाठी आलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबड यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बंधाऱ्याच्या कठड्याला दोरखंडाच्या साहाय्याने बांधून घालून संताप व्यक्त केला.
यावेळी अधिकारी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्यात झटापट झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण बनले होते. अखेर पर्यावरणवादी कार्यकर्ते उदय गायकवाड यांनी शिष्टाई करीत नदी प्रदूषणाला दोषी ठरवून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिंगारे यांनी कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर क्षेत्र अधिकारी हरबड यांची सुटका केली.
पंचगंगा प्रदूषणामुळे मासे मृत पावत आहेत. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी हरबड मृत माशांचा पंचनामा व दूषित पाण्याची पाहणीसाठी तेरवाड बंधाऱ्यावर आल्यानंतर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धारेवर धरले. अधिकारी हरबड यांना दोरखंडाच्या साहाय्याने बंधाऱ्याच्या कठड्याला बांधून घालत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली.
यावेळी अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याने तणाव निर्माण झाला होता. आंदोलनात विश्वास बालिघाटे, बंडू पाटील, रघू नाईक, अभिजित आलासे, अमीर नदाफ यांच्यासह स्वाभिमानी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
--------------
चौकट - लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
पर्यावरणवादी कार्यकर्ते उदय गायकवाड यांनी मुंबई येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिंगारे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत नदी प्रदूषणाची वास्तवता स्पष्ट करीत ठोस निर्णय घेण्याची विनंती केली. त्यानंतर इचलकरंजी पालिकेने नदीतील मृत मासे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट करावेत, काळ्या ओढ्याचे पाणी पंचगंगा पात्रात मिसळत असल्याने या ओढ्यावर दोन दिवसांत तीन बंधारे घालावे, मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हरबड यांची सुटका केली.
फोटो - २३१२२०२०-जेएवाय-०७
फोटो ओळ - तेरवाड (ता. शिरोळ) येथील पंचगंगा बंधाऱ्यावर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यास बांधून घातले.