प्रदूषण नियंत्रण मंडळ इचलकरंजी पालिकेवर कारवाई करणार?, पंचगंगा प्रदूषणप्रश्नी मागितला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 01:09 PM2022-05-19T13:09:15+5:302022-05-19T13:10:28+5:30

इचलकरंजी शहरातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीपात्रात सोडल्याने नदीपात्रात काळेकुट्ट पाणी आल्याने मासे मृत्युमुखी पडण्याची घटना

Pollution Control Board will take action against Ichalkaranji Municipality, Panchganga Pollution Question Requested | प्रदूषण नियंत्रण मंडळ इचलकरंजी पालिकेवर कारवाई करणार?, पंचगंगा प्रदूषणप्रश्नी मागितला खुलासा

प्रदूषण नियंत्रण मंडळ इचलकरंजी पालिकेवर कारवाई करणार?, पंचगंगा प्रदूषणप्रश्नी मागितला खुलासा

googlenewsNext

कुरुंदवाड : सांडपाण्याची प्रक्रिया आणि विल्हेवाट लावण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन उपाययोजना अमलात आणण्याचे निर्देश दिले असतानाही त्याची अंमलबजावणीत हयगय केली जात आहे. त्यामुळे पंचगंगा नदी दूषित होऊन मासे मृत झाल्याची घटना घडली आहे. याचा सात दिवसांत खुलासा द्यावा. अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा लेखी इशारा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे यांनी इचलकरंजी नगरपालिकेला दिली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनात खळबळ उडाली असून पालिका मुख्याधिकारी कोणता खुलासा करतात त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणती कारवाई करते, याकडे इचलकरंजी शहरासह पंचगंगा काठच्या नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

इचलकरंजी शहरातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीपात्रात सोडल्याने रविवारी नदीपात्रात काळेकुट्ट पाणी आल्याने मासे मृत्युमुखी पडण्याची घटना घडली होती. दूषित पाण्याची पाहणी करण्यासाठी आलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबट यांना शिवसेना तालुकाप्रमुख वैभव उगळे, स्वाभिमानी संघटनेचे युवा आघाडी तालुकाप्रमुख बंडू पाटील, विश्वास बालीघाटे आदींनी घेराव घालून नदी दूषित करणाऱ्या घटकावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

तसेच रविवारी सकाळी इंचलकरंजी पालिका सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद असल्याचे अधिकाऱ्यांच्या भेटीत आढळून आले होते. शिवाय मंगळवारी माजी खा. राजू शेट्टी यांनी पंचगंगा नदीची पाहणी करून प्रादेशिक अधिकारी साळुंखे यांना भ्रमणध्वनीवरून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

पाहणी अहवाल, तक्रारीमुळे घेतली कडक भूमिका

क्षेत्र अधिकारी हरबट यांचा प्रत्यक्ष पाहणी अहवाल आणि पंचगंगा काठच्या नागरिकांच्या तक्रारी यामुळे अधिकारी साळुंखे यांनी नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांविरुद्ध कडक भूमिका घेतली असून रविवारच्या घटनेवरून इंचलकरंजी पालिकेला दोषी ठरविण्यात आले आहे. त्यामुळे यावर सात दिवसांत योग्य तो खुलासा करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी साळुंखे यांनी दिले आहेत.

Web Title: Pollution Control Board will take action against Ichalkaranji Municipality, Panchganga Pollution Question Requested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.