‘कृष्णे’ला प्रदूषणाचा विळखा
By Admin | Published: January 2, 2015 10:25 PM2015-01-02T22:25:15+5:302015-01-03T00:10:30+5:30
नृसिंहवाडी : नदी प्रवाहित करण्याची ग्रामस्थांची मागणी
नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा नदी प्रदूषित झाली आहे. नदीचे पाणी प्रवाहित करण्याची तसेच उपाययोजना राबविण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.
श्री क्षेत्र नृसिंहवाडी हे महाराष्ट्रासह अनेक राज्यांत सुप्रसिद्ध असे दत्तक्षेत्र असून, असंख्य भाविक या दत्तक्षेत्रावर श्री दत्त चरणांचे दर्शन घेण्यासाठी तसेच कृष्णा-पंचगंगा या पवित्र संगमस्थानावर स्नान करण्यासाठी येतात. मात्र, सध्या हिप्परगी बंधारावर बरगे घातले असल्याने अखंड वाहणाऱ्या कृष्णा नदीचे पाणी थांबलेले आहे. पाण्याचा प्रवाह थांबल्याने व गटार, नाल्यांचे पाणी थेट नदीत मिसळत असल्याने तसेच कोल्हापूर, इचलकरंजी शहरातील रसायनयुक्तसांडपाण्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित झाली आहे. पंचगंगा व कृष्णा नदी संगम ठिकाणी दूषित पाणी साचत असून, दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
कृष्णा नदीचे पाणी पूर्णपणे हिरवट झाले असून, नदीच्या पाण्यावर तरंगणारी घाण साठली आहे. पाण्याचा प्रवाह थांबला असून पाण्याला दुर्गंधी येत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे लवकरात लवकर नदी प्रवाहित करण्याची गरज आहे. (वार्ताहर)
कृष्णा नदीचे होणारे प्रदूषण निश्चितच खेदाची गोष्ट असून, देवस्थानमार्फत निर्माल्य अगर कचरा टाकण्यासाठी निर्माल्यकुंड ठेवूनदेखील बरेच भाविक श्रद्धेपोटी निर्माल्य नदीत विसर्जन करतात. तसेच देवस्थानच्यावतीने जाळी लावून वेळोवेळी तरंगणारी घाण नावेच्या साहाय्याने काढण्यात येते. तरीही पूर्ण नदी स्वच्छ होत नाही. नदीचे पाणी प्रवाहित करण्यासाठी योग्य त्या अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करण्यात आले असून, मंदिर परिसरातील नदीपात्र स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे.
- संजय पुजारी, अध्यक्ष, दत्त देव संस्थान, नृसिंहवाडी.