Ganesh Mahotsav - सोनाळीत प्रदूषणमुक्त गणेशोत्सव, रंगविरहित शाडूच्या गणेशमूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 12:34 PM2019-09-07T12:34:06+5:302019-09-07T12:50:45+5:30
अतिवृष्टी व महापुराच्या विळख्यात सापडलेल्या करवीर तालुक्यातील सोनाळी हे १७०० लोकसंख्येचे छोटेसे गाव . गेली ७१ वर्षे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रंगविरहित शाडू मातीच्या आकर्षक अशा गणेशमूर्ती बसवून पर्यावरण पूरक गणेशोत्सव येथे साजरा केला जातो . डॉल्बीमुक्ती व निर्माल्याची सुव्यवस्थेत विल्हेवाट लावण्याची प्रथा येथील तरुण मंडळानी चालू ठेवली आहे .
निवास वरपे
म्हालसवडे/कोल्हापूर : अतिवृष्टी व महापुराच्या विळख्यात सापडलेल्या करवीर तालुक्यातील सोनाळी हे १७०० लोकसंख्येचे छोटेसे गाव . गेली ७१ वर्षे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रंगविरहित शाडू मातीच्या आकर्षक अशा गणेशमूर्ती बसवून पर्यावरण पूरक गणेशोत्सव येथे साजरा केला जातो . डॉल्बीमुक्ती व निर्माल्याची सुव्यवस्थेत विल्हेवाट लावण्याची प्रथा येथील तरुण मंडळानी चालू ठेवली आहे .
धाकेश्वर हे या गावाचे ग्रामदैवत आहे . हिंदू धर्मातील सर्व सण वर्षभर पारंपरिक प्रथेप्रमाणे येथे साजरे केले जातात . या गावात अजूनही बलुतेदारी पद्धत सुरू आहे . कुंभार समाजाकडून लागणारे सर्व साहित्य म्हालसवडे येथील कुंभार बांधव या ग्रामस्थांना वर्षभर पुरवतात .
येथील ग्रामदेवतांना गणेशोत्सवामध्ये गणपतीच्या रंगीत मूर्ती चालत नाहीत अशी अख्यायिका आहे . या धार्मिक भीतीपोटी ग्रामस्थ आपल्या घरी गणरायाच्या रंगीत अथवा प्लास्टरच्या मूर्ती बसवतच नाहीत.
पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त असा येथील गणेशोत्सव संपूर्ण राज्यभर माहित झालेला आहे . येथील ग्रामस्थ अबालवृद्ध मंडळी गौरी गणपतीच्या सनावर विशेष लक्ष ठेवून असतात . जय शिवराय व धाकेश्वर तरुण मंडळांच्या माध्यमातून प्रवचन कीर्तन भजन व्याख्याने महाप्रसाद व प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले जातात.
या मध्ये महिलां व मुलीही सक्रीय सहभागी असतात. येथे गणेश आगमनाच्या वेळी व विसर्जन मिरवणुकीच्या वेळीही डॉल्बीमुक्त सण साजरा करण्यासाठी टाळ मृदुंग हलगी लेझीम व झांज पथकांचा वापर केला जातो.