प्रदूषणप्रश्नी महापालिकेस नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:50 AM2021-09-02T04:50:01+5:302021-09-02T04:50:01+5:30
कोल्हापूर : येथील रंकाळा तलावातील पाणी प्रदूषणप्रश्नी महापालिकेच्या जलअभियंत्यांना मंगळवारी येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस पाठवली. सात दिवसात उत्तर ...
कोल्हापूर : येथील रंकाळा तलावातील पाणी प्रदूषणप्रश्नी महापालिकेच्या जलअभियंत्यांना मंगळवारी येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस पाठवली. सात दिवसात उत्तर न दिल्यास जलप्रदूषण कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटिसीतून दिला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी रवींद्र आंधळे यांनी ही नोटीस दिली आहे.
रंकाळा तलावात शाम सोसायटीसह परिसरातील नाल्यातील सांडपाणी थेट मिसळत आहे. परिणामी तलावातील पाणी दूषित होत आहे. जलचर प्राण्यांना धोका पाेहोचत आहे. जलपर्णी वाढत आहे, अशी तक्रार प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई, कॉमन मॅन सामाजिक संस्थेचे ॲड. बाबा इंदूलकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. त्याची दखल घेत प्रदूषण आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने शनिवारी प्रत्यक्ष पाहणी केली होती.
पाहणीत सांडपाणी, मैलामिश्रित पाणी तलावाच्या पाण्यात मिसळत असल्याचे दिसले. मैलामिश्रित पाणीही रंकाळा तलावात मिसळत असल्याचे समोर आले. यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रशासनाने तलावातील प्रदूषण थांबवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, सात दिवसांत उत्तर द्यावे, अशी नोटीस प्रदूषणच्या प्रशासनाने महापालिकेस पाठवली आहे.
कोट
महापालिकेच्या दुर्लक्षपणमुळे रंकाळा तलावातील पाण्यात सांडपाणी, मैलामिश्रित पाणी थेट मिसळत आहे. यामुळे पाणी प्रदूषित झाले आहे. यासंबंधीची तक्रार केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेस नोटीस काढली आहे.
दिलीप देसाई, तक्रारदार, याचिकाकर्ते, पंचगंगा नदी प्रदूषण
पावसाळ्यामुळे शाम सोसायटीच्या नाल्यावरील फळ्या काढल्याने सांडपाणी रंकाळा तलावात जात होते. तक्रार झाल्यानंतर नाल्यावर त्वरित फळ्या बसवण्यात आल्या आहेत. तरीही प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाठवलेली नोटीस अजूनही मिळालेली नाही. मिळाल्यानंतर नोटिसीला रितसर उत्तर दिले जाईल.
अजय साळुंखे, जल अभियंता, महापालिका