लोकसहभागातूनच प्रदूषणमुक्ती

By admin | Published: October 9, 2015 12:24 AM2015-10-09T00:24:20+5:302015-10-09T00:41:44+5:30

दिलीप बोराळकर : वसुंधरा चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

Pollution Reduction through Public Sector | लोकसहभागातूनच प्रदूषणमुक्ती

लोकसहभागातूनच प्रदूषणमुक्ती

Next

कोल्हापूर : जलप्रदूषण, घनकचरा ही सार्वत्रिक समस्या आहे. त्यावर दीर्घकालीन उपायांसाठी केवळ शासकीय धोरणे किंवा योजनांवर आधारित न राहता लोकांनी सहभाग घेतला पाहिजे. त्यातूनच प्रदूषणमुक्ती होईल. शासनाने सुरू केलेली ‘स्वच्छ भारत अभियान’ ही योजना चांगली आहे. ती योग्यरितीने कार्यान्वित झाली तर त्याचे चांगले परिणाम भविष्यात मिळतील, असे मत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निवृत्त सदस्य सचिव डॉ. दिलीप बोराळकर यांनी व्यक्त केले.
शाहू स्मारक भवनमध्ये कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी व किर्लोस्कर उद्योग समूहातर्फे आयोजित सहाव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ झाला. यावेळी ते प्रमुखपाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी किर्लोस्कर आॅईल इंजिनचे जॉर्इंट मॅनेजिंग डायरेक्टर आर. आर. देशपांडे होते. व्यासपीठावर कृष्णा गावडे, प्रकाशराव, चंद्रकांत जोशी, दिलीप बापट, राहुल पवार उपस्थित होते.
बोराळकर म्हणाले, पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न गेली कित्येक वर्षे भेडसावत आहे. मात्र, २००३-०४ मध्ये आम्ही हा प्रश्न सोडविण्यासाठी लोकांचा सहभाग घेतला. एसटीपीसारखे प्लॅन केले, काही योजना मंजूर केल्या. पण, नंतर त्याकडे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे आजही हा प्रश्न गंभीर आहे. घनकचरा व्यवस्थापन या बाबतीत मात्र आडाखे चुकले. कचरा संकलन, व्यवस्थापन, विघटन, खत निर्मिती हे सगळे नियोजन फोल ठरले आहे. केंद्र सरकारने सुरू केलेली ‘स्वच्छ भारत योजना’ चांगल्या पद्धतीने कार्यान्वित व्हावी तसेच महाराष्ट्र शासनानेही काढलेल्या अधिसूचनेवर काम व्हायला हवे.
आर. आर. देशपांडे म्हणाले, ‘प्रदूषण आणि शून्य कचरा’ या विषयावर प्रबोधन व्हावे, नागरिकांना प्रदूषणाच्या धोक्याची जाणीव व्हावी व महोत्सवाचे चळवळीत रूपांतर व्हावे, हा उद्देश आहे. कोल्हापुरातील गणेशमूर्ती, निर्माल्य दान चळवळीने राज्याला आदर्श दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
चंद्रकांत जोशी यांनी प्रास्ताविक केले. उदय गायकवाड यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. समीर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. राहुल पवार यांनी आभार मानले. त्यानंतर डेव्हिड टनबरो दिग्दर्शित ‘फिश’ या लघुपटाने महोत्सवाला प्रारंभ झाला.


सुरेख प्रदर्शन
या महोत्सवांतर्गत टाकाऊपासून टिकाऊ, शून्य कचरा या विषयावर चित्रकला स्पर्धा, विविध कलात्मक वस्तू बनविण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील निवडक कलाकृती हॉलच्या बाहेर मांडण्यात आल्या आहेत. त्या निरखून पाहिल्यानंतर त्या कोणत्या वस्तूंपासून बनवल्या आहेत ते समजते.
महोत्सवात आज
सकाळी ७ : जय सामंत यांच्या ‘राई’ घरास भेट
११ वाजता : लघुपट (शाहू स्मारक)
टेल्स आॅफ टायगर लँड
देवराई
वेस्ट सॅग्रीगेशन
रिड्यूस, रियूज, रिसायकल
दुपारी १२ वाजता : स्टॉफ ओपन डिफिकेशन
व्हॉट अ लोड आॅफ रबिश
लिव्हिंग विथ जायंटस्
मिरॅकल इन कोलकाता
दुपारी अडीच वाजता : रिटर्न आॅफ द टायग्रेस
होम ग्रोन
राजहंस द स्वान्स आॅफ इंडिया
दुपारी साडेचार : टाकाऊतून टिकाऊ प्रात्यक्षिक

Web Title: Pollution Reduction through Public Sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.