प्रदूषण झाले, मासे मेले पण कारवाई शुन्यच!
By admin | Published: December 25, 2014 12:47 AM2014-12-25T00:47:47+5:302014-12-25T00:48:03+5:30
‘भोगावती’नदीची स्थिती : प्रदूषण नियंत्रण मंडळ हतबल
कोल्हापूर : भोगावती नदी दुर्गंधीयुक्त मळीमिश्रित पाणी मिसळले, हजारो मासे तडफडून मेले परंतू हे कुणामुळे झाले कुणालाच माहित नाही अशी सध्याची स्थिती आहे. नदी प्रदूषित होऊन चार दिवस उलटले तरी प्रदूषण नियंत्रण मंडळ दूषित पाण्याचा स्त्रोत शोधून काढू शकलेले नाही. प्रदूषण कशामुळे झाले हेच माहीत नसल्यामुळे कारवाई झालेली नाही. ‘प्रयोगशाळेतून अहवाल काय एका दिवसात येतो का?’ अशी विचारणा प्रदूषण नियंत्रण मंडळ करत आहे.
‘आम्ही काय करावे, असे तुम्हाला वाटते?’ असा प्रतिप्रश्नच मंडळाचे अधिकारी करीत आहेत; त्यामुळे कारवाईसंबंधी साशंकता व्यक्त केली जात आहे. कोणाच्या तरी दबावाला बळी पडून कारवाई थांबवली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न उच्च न्यायालय गांभीर्याने घेते आहे. दीर्घकालीन उपाययोजनांवर देखरेख करण्यासाठी समिती स्थापन केली. तरीही जलप्रदूषणासारख्या विषयाकडे किती गांभीर्याने मंडळ पाहते, हेही समोर येत आहे.
भोगावती नदीमध्ये हळदी बंधाऱ्यास बरगे घालून पाणी अडविले. मळीमिश्रित काळे पाणी भोगावती नदीत शुक्रवारी (दि. १९) रोजी सायंकाळनंतर बंधाऱ्यापर्यंत मिसळले; त्यामुळे पाणी दूषित होऊन मासे मेले. याचे पडसाद उच्च न्यायालयात सोमवारी (दि. २२) उमटले. राजकीय दबावापोटी मंडळ संबंधित कारखान्यावर कारवाई करीत नसल्याचा आरोप झाला. इतके सारे झाल्यानंतरही प्रदूषण मंडळास नदी कशामुळे प्रदूषित झाली हेच कोडे अजून सुटलेले नाही. जिलेटनमुळे मासे मरु शकतात परंतू त्यामुळे पाणी इतके घाण होण्याची शक्यता नाही. शिवाय जिलेटन वापरले असेल तर ते कुणी वापरले याचाही शोध व्हायला हवा. प्रदूषण कुणी केले यावर त्यावर कारवाई करायची की नाही हे ठरले जावू नये अशी अपेक्षा नदी परिसरातील ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. प्रदूषित पाणी, सुटलेली दुर्गंधी, मेलेले मासे हे सर्व प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मध्यरात्री घटनास्थळी जावून पाहिले आहे.
तीन टँकरचा शोध सुरू आहे, अद्याप ते मिळालेले नाहीत. अहवाल प्रयोगशाळेकडे पाठविला आहे. तो काय एका दिवसात मिळतो का? तुम्हाला आम्ही काय करणे अपेक्षित आहे? कारवाई झाल्यानंतर सांगतो. कारवाईसंबंधी भविष्य कसे सांगू?
- एस. एस. डोके, प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ