सर्व्हेअरमुळे मतदार याद्यांचा घोळ
By admin | Published: September 21, 2015 12:24 AM2015-09-21T00:24:04+5:302015-09-21T00:32:11+5:30
प्रारूप यादी : तक्रारींचा ओघ; शहरवासीयांतून संतप्त प्रतिक्रिया
कोल्हापूर : महापालिका निवडणूक प्रक्रिया म्हणजे घोळाचा एक उत्तम नमुना होय. या निवडणुकीतील प्रभाग सर्व्हेअर आणि अभियंता यांच्या अहवालानंतर हा मतदार यादींचा घोळ चव्हाट्यावर आला. प्रभाग आरक्षणाचे त्रांगडे, प्रभाग रचनेतील घोळ आणि आता मतदारच गायब असलेल्या प्रभागवार मतदार याद्या प्रसिद्ध झाल्याने उमेदवारही गोंधळून गेले आहेत. अनेक प्रभागांतून अख्ख्या गल्ल्याच गायब झाल्याचे, तसेच मतांचे गठ्ठे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात वर्ग झाल्याचे यादीतून दिसले आहेत. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया राबविताना विनाअनुभवी अधिकाऱ्यांकरवी राबविल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत तक्रारींचा ओघ सुरू झाला असून, रविवारी कार्यालयाला सुटी असल्याने शनिवारी मोजक्याच तक्रारी दाखल झाल्या.आज, सोमवारीही महापालिकेला सुटी आहे; पण मतदार याद्यांची अवस्था पाहून आज दुपारपर्यंत हे कार्यालय तक्रारी दाखल करून घेण्यासाठी सुरूच राहणार आहे. २८ सप्टेंबरपर्यंत या प्रभागवार मतदार याद्यांवर हरकती घेण्याची मुदत आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी प्रक्रिया गतिमान झाली आहे; पण ही प्रक्रिया राबविताना प्रत्येक टप्प्यावर घोळ झाल्याचे निदर्शनास आल्याने या प्रशासकीय यंत्रणेतील बेफिकीरपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. गेल्या अनेक पंचवार्षिक निवडणुकीत अशा पद्धतीने कोणत्याही उणिवा बाकी राहिल्या नव्हत्या; पण यंदाच्या या निवडणुकीत प्रथमच प्रत्येक टप्प्यावर सावळागोंधळ दिसत आहे. प्रथम प्रभागवार आरक्षण टाकताना यंत्रणेकडून झालेल्या चुका निवडणूक आयोगानेच निदर्शनास आणून ती प्रक्रिया नव्याने सदोषपणे राबविली. पाठोपाठ प्रभाग रचना तयार करताना झालेली जुन्या प्रभागाची फोडाफोड केली. त्यानंतर निर्मिती झालेल्या प्रभागात भौगोलिक संलग्नता नसल्याचे निदर्शनास आले. हरकतींमध्ये अनेक प्रभागांमध्ये नव्याने बदल झाले. दोन प्रभागांची तर नावेच बदलली. हा झालेला घोळ कमी असताना आता प्रभागवार प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्यांचा घोळ नव्याने चव्हाट्यावर आला.
एक म्हणजे, वेळेवर मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या नाहीत, तर प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्या झेरॉक्स काढल्यानंतर त्या स्पष्ट दिसत नसल्याने नागरिकांतून संतापाची लाट पसरली होती. त्यानंतर या मतदार याद्या चाळल्यानंतर उमेदवारच हडबडले.
गांधी मैदान, शिवाजी मार्केट, राजारामपुरी, ताराराणी मार्केट या चार विभागीय कार्यालयांकडून विभागवार प्रसिद्ध झालेल्या बहुतांश प्रभागांतील याद्यांमध्ये अक्षम्य चुका आढळल्या. अनेक प्रभागांतील मतदारांचे गठ्ठेच गायब झाले आहेत, तर अनेक प्रभागांतील गल्ल्या दुसऱ्या प्रभागात समाविष्ट केल्याचे निदर्शनास आले आहे.
सिद्धाळा गार्डन या प्रभागात ६,५२५ मतदार संख्या असताना प्रत्यक्ष प्रभागाच्या जाहीर झालेल्या मतदार यादीमध्ये अवघ्या ५००० मतदारांचा समावेश दर्शविला आहे. म्हणजेच यादीतून सुमारे दीड हजार मतदार गायब असल्याचे निदर्शनास आले आहे. उमा चित्रमंदिर परिसरातील पूर्ण कापडे गल्ली मतदार यादीतून गायब झाली आले. कैलासगडची स्वारी या प्रभागातील मतदार यादीतून काही मतदार सिद्धाळा मतदार यादीत दिसून येतात, तर तस्ते गल्लीचा समावेश शिवाजी उद्यमनगर प्रभागाच्या मतदार यादीत दाखविला आहे. याशिवाय शिवाजी उद्यमनगर प्रभागातून दिलबहार तालीम परिसरातील तीन गल्ल्यांतील सुमारे सातशे मतदार गायब आहेत, तर बहुतांश प्रभागांतून किमान ६०० ते ८०० मतदार गायब आहेत. तसेच अनेक प्रभागांच्या मतदार याद्यांतून अनेक मतदारांची नावेच गायब आहेत. निवडणूक प्रक्रिया राबविताना ती काटेकोरपणे राबवावी लागते; पण येथे प्रत्येक टप्प्यावर चुका निदर्शनास आल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया राबविताना प्रशासकीय यंत्रणेने किती बेफिकीरपणा केला, हे निदर्शनास आले आहे. (प्रतिनिधी)
विशेष म्हणजे, गुगलवरून घेतलेल्या शहराच्या नकाशावरून महापालिकेचे सर्व्हेअर आणि अभियंता यांनी एकत्रित मिळून प्रभाग रचना तयार केली आहे. हा प्रभाग रचनेचा अहवाल त्यांनी प्रत्येक वॉर्ड कार्यालयांना दिला आहे. त्यानंतर या अहवालावर शहर अभियंत्यांनी मतदारांच्या याद्या फोडून त्या निवडणूक कार्यालयाकडे दिल्या आहेत. पण ही प्रक्रिया अधिकाऱ्यांनी प्रथमच राबविल्याचे निदर्शनास आले आहे. निवडणूक कार्यक्रमाबाबत विनाअनुभवी असलेल्या या अधिकाऱ्यांच्या हाती ही प्रक्रिया सोपविल्याने हा घोळ झाल्याचे महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी सांगितले.