‘तंत्रनिकेतन’ने दर्जेदार मनुष्यबळ पुरवावे
By admin | Published: February 27, 2015 10:21 PM2015-02-27T22:21:28+5:302015-02-27T23:19:49+5:30
के. बी. जिंदाल : कोल्हापूर तंत्रनिकेतनचा २०वा पदविका प्रदान समारंभ दिमाखात
कोल्हापूर : देशातील उद्योगांना कुशल तंत्रज्ञान अवगत असलेल्या मनुष्यबळाची गरज आहे़ त्यामुळे तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्थांनी कुशल मनुष्यबळ पुरविण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा दिल्या पाहिजेत़ विद्यार्थ्यांनीही कल्पक दृष्टिकोनाचा विकास केल्यास तंत्रज्ञान क्षेत्रात देशाला बळकटी येईल, असे प्रतिपादन वेस्टर्न इंडिया फोर्जिंग्सचे चेअरमन व ज्येष्ठ उद्योजक के़ बी़ जिंदाल यांनी केले़ कोल्हापूर शासकीय तंत्रनिकेतनचा २० वा पदविका प्रदान समारंभ शुक्रवारी झाला़ या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते़ यावेळी पुणे विभागाचे तंत्रशिक्षण सहसंचालक आणि कोल्हापूर शासकीय तंत्रनिकेतनच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष पी़ व्ही़ सरोदे यांच्या हस्ते स्नातकांना पदविका प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली़
जिंदाल म्हणाले, या देशातील युवक हुशार आहेत़ या देशातील अनेक तरुण अमेरिका व अन्य परकीय देशांत जाऊन काम करीत आहेत़ मग तिथे इथे का काम करीत नाहीत, याचा विचार होणेही गरजेचे आहे़ तंत्रज्ञान क्षेत्रातील युवकांच्या कौशल्याचा उपयोग देशाच्या तंत्रज्ञान क्षेत्रासाठी करून घेतला पाहिजे़
भारताने तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती केली आहे़; पण संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानाबाबत आजही चीन आणि कोरिया हे देश आपल्यापेक्षा पुढे आहेत़ संरक्षणासंबंधीच्या साधनसामग्रीसाठी भारताला बरेच परकीय चलन खर्च करावे लागते़ त्यामुळे या क्षेत्रात कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी तंत्रज्ञानाचे शिक्षण देणाऱ्या संस्थांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षाही जिंदाल यांनी व्यक्त केली़
स्नातकांना संदेश देताना जिंदाल म्हणाले, कष्टाला पर्याय नाही़ माझी पार्श्वभूमीही मध्यमवर्गीय होती़ कष्टाच्या जोरावरच इथपर्यंत पोहोचलो आहे़ मालक आणि नोकर यांनी परस्परांचा आदर केला, तर कंपनी आणि नोकरवर्ग या दोहोंचीही भरभराट होईल़
यावेळी सरोदे यांच्या हस्ते स्थापत्य अभियांत्रिकी, यंत्र, विद्युत, औद्योगिक अणुविद्युत, अणुविद्युत व दूरसंचार, शर्करा उत्पादन तंत्र, माहिती तंत्रज्ञान, धातू अभियांत्रिकीच्या स्नातकांना पदविका प्रदान करण्यात आली़ तंत्रनिकेतनच्या प्राचार्या एम़ ए़ चिगटेरी यांनी अहवाल वाचन केले़
यावेळी तंत्रनिकेतनच्या नियामक मंडळाचे सदस्य व्ही़ डी़ पाटील, ज्येष्ठ उद्योजक आणि नियामक मंडळाच्या अभ्यास मंडळाचे निमंत्रित अध्यक्ष किरण पाटील, तंत्रनिकेतनचे सदस्य ए़ बी़ पर्वते-पाटील, विक्रमसिंग शिंदे, उपप्राचार्य के. पी़ कुंभार तसेच विविध विभागप्रमुख उपस्थित होते़ यू़ एम़ कारखानीस यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला़ (प्रतिनिधी)