मोबाइल नेटवर्क, वीजपुरवठा नसल्याने ‘पॉलिटेक्निक’च्या विद्यार्थ्यांची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:21 AM2021-07-25T04:21:32+5:302021-07-25T04:21:32+5:30
कोल्हापूर : महापुरामुळे मोबाइल नेटवर्क आणि वीजपुरवठा खंडित झाल्याने तंत्रनिकेतनमधील (पॉलिटेक्निक) पदविका अभियांत्रिकी (डिप्लोमा इंजिनिअरिंग) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ...
कोल्हापूर : महापुरामुळे मोबाइल नेटवर्क आणि वीजपुरवठा खंडित झाल्याने तंत्रनिकेतनमधील (पॉलिटेक्निक) पदविका अभियांत्रिकी (डिप्लोमा इंजिनिअरिंग) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देणे अडचणीचे ठरत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहणार आहेत.
या विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सत्रातील कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या परीक्षा दि. १३ जुलैपासून ऑनलाइन एमसीक्यू पद्धतीने सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये पदविका अभियांत्रिकीच्या तिन्ही वर्षांच्या परीक्षांचा समावेश आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली आणि कोकणामध्ये महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोबाइल नेटवर्क, वीजपुरवठा खंडित झाल्याने या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात अडचण निर्माण झाली आहे. ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर परीक्षकांनी त्यांच्या पॉलिटेक्निकच्या परीक्षा कक्षातून ऑनलाइन नजर ठेवायची आहे; पण महापुरामुळे या परीक्षकांनादेखील पॉलिटेक्निकपर्यंत जाता येत नाही. या तांत्रिक अडचणीबाबत पुढे काय करायचे याची कोणतीही सूचना अधिकृतपणे पॉलिटेक्निकमधील शिक्षकांना राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून मिळालेली नाही. या मंडळाने लवकर सूचना करावी. अडचणीतील विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेऊन त्यांना दिलासा देण्याची गरज आहे.
चौकट
ऋतुराज पाटील यांची उच्चशिक्षणमंत्र्यांकडे मागणी
सध्या डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या सध्या सुरू असलेल्या ऑनलाइन परीक्षा देताना मोबाइल नेटवर्क नसणे, खंडित वीजपुरवठा यामुळे विद्यार्थ्यांना अडचण येत आहे. याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे ट्विटरद्वारे केली आहे. या पाच जिल्ह्यांतील शेकडो विद्यार्थी महापुरामुळे परीक्षेपासून वंचित राहू शकणार आहेत.
प्रतिक्रिया
महापुराच्या नैसर्गिक आपत्तीमुळे कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अडचणीचे ठरत आहे. ते लक्षात घेऊन तंत्रशिक्षण मंडळाने या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेणे योग्य ठरणार आहे.
-प्रशांत पट्टलवार, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन