पॉलिटेक्निकचे ‘तंत्र’ बिघडणार; १५ दिवसांत १० टक्के विद्यार्थ्यांचे अर्ज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:17 AM2021-07-16T04:17:13+5:302021-07-16T04:17:13+5:30
कोल्हापूर : शासकीय आणि खासगी तंत्रनिकेतनमधील (पॉलिटेक्निक) पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन १५ दिवस पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत ...
कोल्हापूर : शासकीय आणि खासगी तंत्रनिकेतनमधील (पॉलिटेक्निक) पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन १५ दिवस पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील २३ पॉलिटेक्निकमध्ये सुमारे १० टक्के विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. दहावीचा निकाल आज, शुक्रवारी ऑनलाइन जाहीर होणार आहे. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेची गती वाढणार आहे. मात्र, गुणपत्रिका आणि आवश्यक दाखले वेळेत मिळाले नाहीत, तर प्रवेशाचे ‘तंत्र’ बिघडण्याची शक्यता आहे.
दहावीच्या निकाल जाहीर होण्याची प्रतीक्षा न करता राज्यातील तंत्रशिक्षण संचालनालयाने पॉलिटेक्निकमधील विविध पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया दि. ३० जूनपासून सुरू केली. ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत दि. २३ जुलैपर्यंत आहे. ई-स्क्रूटिनी आणि सुविधा केंद्रामध्ये जाऊन कागदपत्रांची पडताळणी करण्याची सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होऊन १५ दिवस पूर्ण झाले, तरी अद्याप कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १० टक्के विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. दहावीची गुणपत्रिका नसल्याने आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने अर्ज करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल थोडा कमी आहे. प्रवेशाची गती वाढण्यासह प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि अन्य दाखले वेळेत मिळणे आवश्यक आहे.
पॉईंटर
जिल्ह्यातील एकूण पॉलिटेक्निक : २३
शासकीय पॉलिटेक्निक : १
अनुदानित पॉलिटेक्निक : १
खासगी पॉलिटेक्निक : २१
एकूण प्रवेश क्षमता १५०००
आतापर्यंत दाखल अर्ज : १५००
अर्ज भरण्याची अखेरची मुदत : २३ जुलै
चौकट
विद्यार्थ्यांकडे बैठक क्रमांकच नाही
विद्यार्थ्यांकडे सध्या दहावीची गुणपत्रिका नाही. त्यामुळे त्यांना पदविका अभ्यासक्रमाला ऑनलाइन अर्ज करताना त्यामध्ये बैठक क्रमांक नोंदवायचा आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांकडे बैठक क्रमांकच नसल्याने त्यांची अडचण झाली आहे.
चौकट
गेल्यावर्षी ४० टक्के जागा रिक्त
गेल्यावर्षी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत दोन महिने वाढविण्यात आली होती. मुदतवाढ देऊनही खासगी पॉलिटेक्निकमध्ये ४०, तर शासकीय पॉलिटेक्निकमधील काही अभ्यासक्रमांच्या ६ ते ७ टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या.
विद्यार्थ्यांची अडचणी काय?
प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला, आदी कागदपत्रे वेळेत उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे.
-प्रथमेश बुवा, महागोंड.
मला मॅकेनिकल पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे. दहावीची गुणपत्रिका मिळाल्यानंतर मी अर्ज भरणार आहे. प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी.
-केवल चव्हाण, उत्तूर.
प्रतिक्रिया
दहावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून चौकशी सुरू आहे. त्यातील काहींनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. अर्ज करण्याची गती दहावीचा निकाल लागल्यानंतर वाढेल. त्याबरोबर प्रवेशासाठी लागणारी विविध दाखले शासनाकडून विद्यार्थ्यांना लवकर उपलब्ध व्हावेत.
-जयंत घेवडे, प्राचार्य, इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल अँड रूरल इंजिनिअरींग गारगोटी.