अंबाबाईची कौमारी रूपात पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 11:47 PM2018-10-14T23:47:12+5:302018-10-14T23:47:16+5:30
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला (रविवारी) करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची कौमारी देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. सुटीचा दिवस ...
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला (रविवारी) करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची कौमारी देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. सुटीचा दिवस असल्याने परस्थ भाविकांची मंदिरात अलोट गर्दी होती. मंदिराबाहेर पहाटे चार वाजल्यापासूनच दर्शनरांगा लागल्या होत्या. दुपारपर्यंत अडीच लाख भाविकांचा आकडा पार झाला होता. रात्री उशिरापर्यंत गर्दीचा ओघ कायम राहिल्याने कोल्हापूर हाऊसफुल्ल झाले होते.
अश्विन शुद्ध पंचमीयुक्त षष्ठीच्या दिवशी श्री अंबाबाईची कौमारी रूपात पूजा बांधण्यात आली. ही देवी नवकुमाराचे म्हणजेच स्कंदाचे स्त्रीरूप आहे. ही देवता सप्तमातृकांपैकी एक असून, तिचा मत्स्यपुराण, महाभारत, देवीमाहात्म्यामध्ये उल्लेख येतो. मत्स्यपुराणानुसार शिवाने अंधकासुराच्या नाशासाठी मातृकांची निर्मिती केली. त्यांतील कौमारी ही एक मातृका.
देवीमाहात्म्यानुसार महासरस्वती अथवा कौशिकीच्या मदतीला शुंभ-निशुंभांच्या विरोधात ज्या मातृका निर्माण झाल्या, त्यांत कौमारीचा उल्लेख येतो. कुमार स्कंदाची शक्ती म्हणून हातामध्ये तिने भाला घेतलेला आहे. मोरपिसांनी सुशोभित, कोंबडा, मोर आणि नागांनी परिवेष्टित असे तिचे स्वरूप आहे. अरण्यात एकांतसेवन करणारी अशी ती देवसेनास्वरूप कौमारी आहे.
दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासूनच मंदिरात भाविकांची अलोट गर्दी होती. रविवारी तर या गर्दीने पाच दिवसांचा उच्चांक गाठला. पहाटे चार वाजल्यापासून मंदिराबाहेर भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. एरवी सुटीचा दिवस म्हटले की शहरात शुकशुकाट असतो. रविवारी मात्र नेमके उलटे चित्र होते. कोल्हापूर शहरातील मिरजकर तिकटी, बिंदू चौक, न्यू महाद्वार रोड ते पापाची तिकटी, बिंदू चौक ते लक्ष्मीपुरी, ताराबाई रोड, भाऊसिंगजी रोड, खासबाग हे शहरातील मध्यवर्ती रस्ते केवळ भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.