अंबाबाईची शैलपुत्रीमाता रूपात पूजा
By Admin | Published: October 4, 2016 12:24 AM2016-10-04T00:24:50+5:302016-10-04T00:58:43+5:30
नवरात्रौत्सवाची तिसरी माळ : तुळजाभवानी देवीची अश्वारूढ रूपात पूजा
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या माळेला सोमवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची श्री शैलपुत्रीमाता रूपात पूजा बांधण्यात आली. जुना राजवाड्यातील श्री तुळजाभवानी देवीची अश्वारूढ रूपात पूजा बांधण्यात आली. रात्री अंबाबाईची पालखी तीन शिखर आकारात काढण्यात आली.
नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या माळेला विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे, ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते श्री अंबाबाईचा अभिषेक झाला. दुपारच्या आरतीनंतर अंबाबाईची श्रीशैलपुत्री माता रूपात पूजा बांधण्यात आली. आमंत्रण नसताना शिवपत्नी सती दक्ष प्रजापतीच्या महायज्ञामध्ये गेली होती. तेथे शिवाचा अपमान झाल्यामुळे यज्ञकुंडामध्ये सतीने देहत्याग केला. हे समजल्यानंतर शिवाने वीरभद्रादी शिवगण यांना दक्ष यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी पाठविले. या गणाने दक्ष यज्ञाचा विध्वंस केला तो दिवस अश्विन वद्य महाअष्टमीचा होता. त्यामुळे देवी सांप्रदायात शारदीय नवरात्रातील महाअष्टमीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यानंतर सतीने पर्वतराज हिमवंताच्या पोटी शैलपुत्री (पार्वती) नावाने जन्म घेतला. पूर्वजन्मसंचितानुसार याही जन्मी तिचा विवाह शिवाशीच झाला. करवीरनिवासिनी अंबाबाई ही साडेतीन शक्तिपीठातील एक देवता असल्याने यानिमित्ताने तिची शैलपुत्रीमाता रूपात बांधण्यात आली. ही नवदुर्गातील व नवरात्र व्रतामधील प्रथम देवता आहे. ही पूजा नीलेश ठाणेकर, दिवाकर ठाणेकर, श्रीनिवास जोशी यांनी बांधली.
दिवसभरात सद्गुरू सेवा माऊली महिला मंडळ, सिद्धीविनायक महिला भजनी मंडळ, महालक्ष्मी भजनी मंडळ, नारायणी महिला सोंगी भजनी मंडळ, स्त्री संकल्पनांवर आधारित गाणी, ऋतुजा गोखले व दीपा उपाध्ये यांचे नृत्य हे सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. रात्री साडेनऊ वाजता देवीची पालखी तीन शिखर आकारात काढण्यात आली. अॅड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते पालखी पूजन झाले. जुना राजवाड्यातील श्री तुळजाभवानीदेवीची अश्वारूढ रूपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा बाळकृष्ण दादर्णे, अमर झुगर, सारंग दादर्णे, विजय बनकर यांनी बांधली.
देवी महात्म्य पठणास प्रतिसाद
उत्सव काळात अंबाबाई मंदिरात मंत्रविद्यावाचस्पती मयूरा जाधव यांच्यावतीने सादर होणाऱ्या मंत्रपठणात भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महालक्ष्मी सुप्रभातम्, महालक्ष्मी सहस्त्रनाम, श्रीसुक्त, रूद्र, श्री शिवमहिम्न स्तोत्र, श्री विष्णू सुप्रभातम, पुरुष सुक्त, दत्तात्रेय वज्रकवच या मंत्रांचे पठण केले जाते. शास्त्रीय संगीत व संस्कृत भाषेत पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या जाधव यांना श्री जगद्गुरू शंकराचार्य श्रृंगेरीपीठ यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
देणगी आवाहनाची चर्चा
महाराष्ट्रातील केवळ अंबाबाई हे एकमेव मंदिर आहे. जेथे श्रीपूजक किंवा मंदिराशी संबंधित कोणतीही यंत्रणा भाविकांकडे थेट रोख रक्कम किंवा देणगीची मागणी करत नाही. यंदाच्या वर्षी मात्र ‘देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी देवस्थान समितीमध्ये आपली देणगी जमा करावी’ यासाठी वारंवार माईकद्वारे आवाहन केले जात असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.
महापालिकेचे वॉटर एटीएम बंद
अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी महापालिकेच्यावतीने विद्यापीठ गेट परिसरात वॉटर एटीएम बसविण्यात आले आहे. नवरात्रौत्सव सुरू होऊन तीन दिवस झाले तरी महापालिकेने हे एटीएम सुरू केलेले नाही. मात्र, भाविकांची पिण्याच्या पाण्याची गरज स्वयंसेवी संस्था व व्यक्तींनी पूर्ण केली आहे. श्रीपूजक गजानन मुनिश्वर यांच्याकडूनही रांगांमध्ये थांबलेल्या भाविकांना पाणी दिले जाते.