पूजा बनली सीमाभागातील पहिली कोब्रा कमांडो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:25 AM2021-08-23T04:25:32+5:302021-08-23T04:25:32+5:30

शिवानंद पाटील गडहिंग्लज : केवळ जिद्द आणि कष्टाच्या जोरावर ती केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) भरती झाली. बेळगाव जिल्ह्यातील ...

Pooja became the first Cobra Commando on the border! | पूजा बनली सीमाभागातील पहिली कोब्रा कमांडो !

पूजा बनली सीमाभागातील पहिली कोब्रा कमांडो !

Next

शिवानंद पाटील

गडहिंग्लज : केवळ जिद्द आणि कष्टाच्या जोरावर ती केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) भरती झाली. बेळगाव जिल्ह्यातील या २२ वर्षीय लेकीचे नाव आहे, पूजा अरविंद चव्हाण. सीमाभागातील ती पहिली महिला ‘कोब्रा कमांडो’ ठरली आहे. गडहिंग्लजपासून १२ कि.मी. अंतरावरील हुक्केरी तालुक्यातील ४ हजार लोकसंख्येचे मतीवडे हे तिचे गाव आहे.

याठिकाणी फारशा सोयीसुविधा नाहीत. त्यामुळे येथील लोकांना गडहिंग्लज, संकेश्वर व निपाणी या जवळच्या शहरांवरच अवलंबून रहावे लागते.

पूजाचा प्रवासही याच खेड्यातून सुरू झाला. तिचे वडील अरविंद यांनी वर्तमानपत्रात आलेली सीआरपीएफ भरतीची जाहिरात तिला दाखवली आणि त्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले. २०१७ मध्ये सीआरपीएफमध्ये भरती झाल्यावर तिने अजमेरमध्ये एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले. रिव्हॉल्वर, रायफल चालविण्याबरोबरच कार्बाइन, एल.एम.जी. बॉम्ब फोडणे अशा अनेक गोष्टी तिने आत्मसात केल्या आहेत.

प्रशिक्षणार्थी २०० मुलींमधून ५ मुलींची ‘कोब्रा कमांडो’साठी निवड झाली. त्यात पूजाचाही समावेश आहे. कमांडोच्या पाच महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर तिची छत्तीसगड किंवा गडचिरोली येथे नियुक्ती होणार आहे.

पूजा यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मत्तीवडे येथे, बारावीपर्यंतचे शिक्षण गडहिंग्लजच्या शिवराज महाविद्यालयात तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून इंग्रजी विषयाच्या पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे.

केवळ शेती हेच उपजीविकेचं साधन असलेल्या गरीब कुटुंबातील ही कन्या कोब्रा कमांडो बटालियन साठी तयार झाली आहे. तिचा हा प्रवास सीमाभागातील युवक-युवतींसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

-------------------------

लेकीचं यश पाहण्यापूर्वीच..!

इंग्रजी विषयातून पदवी घेतलेल्या पूजाने वडिलांचा शब्द प्रमाण मानून जिद्दीने व मेहनतीने त्यांचे स्वप्न साकार केले. परंतु, लेकीचे यश पाहण्यापूर्वीच अरविंद यांचा कर्करोगाने मृत्यू झाला. त्याचे शल्य तिच्यासह पंचक्रोशीतील सर्वांना आहे.

-------------------------

पूजा चव्हाण : २१०८२०२१-गड-०३

Web Title: Pooja became the first Cobra Commando on the border!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.