पूजा भोसलेंचे बँक खातेही बोगसच; खात्यावर ३८४ कोटींची रक्कम, कोल्हापुरातील निवारा ट्रस्टची लुबाडणूक
By विश्वास पाटील | Published: May 9, 2023 02:26 PM2023-05-09T14:26:12+5:302023-05-09T14:31:06+5:30
पैसे मिळेनात म्हणून तक्रारदारांनी तगादा लावल्यावर पूजा भोसले यांनी स्वत:हून त्यांच्या आयडीबीआय बँकेतील खात्याचे स्टेटमेंट काढून तक्रारदारांना दिले
विश्वास पाटील
कोल्हापूर : निवारा टेस्टामेंटरी ट्रस्ट ॲन्ड एनजीओच्या प्रमुख पूजा अजित भोसले-जोशी यांचे आयडीबीआय बँकेतील खातेही बनावट असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यांनी स्वत:हून दिलेल्या बँकेच्या स्टेटमेंटनुसार त्यांच्या खात्यावर थोडीथोडकी नव्हे, तब्बल ३८४ कोटी ९८ लाख रुपयांची शिल्लक आहे. परंतु, त्याच खात्यावर किमान बॅलन्सही ठेवता आले नसल्याने आयडीबीआय बँकेने २०२१ मध्येच त्यावर व्यवहार करण्यास निर्बंध आणण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ या ट्रस्टचे सारेच व्यवहार धडधडीत खोटे असल्याचे दिसत आहे.
लोकांनी या ट्रस्टकडे ३९०० रुपये भरले व ट्रस्टने त्यांना गिफ्ट डीडची नोटरी करून दिली. नोटरीचे प्रत्येकी ६०० रुपये वेगळेच घेतले. म्हणजे काही जणांकडून ४५०० व काहींकडून सहा हजारही उकळले आहेत. ट्रस्टने ज्या गिफ्ट डीड म्हणून आयडीबीआय बँकेच्या पावत्या दिल्या त्याची मुदत मागच्या महिन्यात संपली. त्याचे पैसे मिळेनात म्हणून तक्रारदारांनी तगादा लावल्यावर पूजा भोसले यांनी स्वत:हून त्यांच्या आयडीबीआय बँकेतील खात्याचे स्टेटमेंट काढून तक्रारदारांना दिले. हे खाते आयडीबीआयच्या डब्लूटीसी कॉम्प्लेक्स, कफ परेड रोड मुंबई शाखेतील आहे. त्याचा अकउंट नंबर ०४८५१०४०००३५७३१९ असा आहे. सुपर सेव्हिंग्ज प्रकारातील हे अकाउंट आहे.
जून २०१९ला २० हजार ५७४ रुपये भरून ते सुरू करण्यात आले आणि त्यावरील क्लोजिंग बॅलन्स मात्र ३८४ कोटी ९८ लाख ३५ हजार ७८६ रुपये आहे. हे खाते जून २०१९ ला सुरू झाले असले तरी व्यवहार मात्र १८ ऑक्टोबर २०२० पासून सुरू झाले आहेत. त्यामध्ये २०२० मध्ये चार, २०२१ मधील १६ आणि २०२२ मधील ४६ व्यवहारांच्या नोंदी आहेत. फसवणुकीचा कहर म्हणजे २०२१ मध्येच या खात्यावर व्यवहार बंद झाले आहेत. चेकबुक नाही, रिटर्न्स भरलेले नाहीत म्हणून त्यावरील पैसे काढता येत नसल्याचे सांगून त्यांनी तक्रारदारांना पैसे देण्यास टाळाटाळ केली आहे. शाहूपुरी पोलिसांनी बँकेकडे त्याता उतारा मागवला, त्यामध्ये या खात्यावर निर्बंध आणले असल्याचे स्पष्ट झाले.
यांचीही होणार चौकशी...
या ट्रस्टने आयडीबीआय बँकेचा लोगाे वापरून ठेव पावत्या दिल्या आहेत. मूळ ठेव पावत्यात कुणी आणि कुठे बदल केला, त्याचे शिक्के कुणी करून दिले, नोटरी कुणी केल्या आहेत याचीही चौकशी पोलिस करणार आहेत. बहुतांशी नोटरी कागलमध्ये केल्या आहेत. कारण भोसले यांच्याइतकीच खोटी कागदपत्रे करून देणारेही तितकेच या फसवणुकीस जबाबदार आहेत.
बँकेला दिले पत्र...
शाहूपुरी पोलिसांनी आयडीबीआय बँकेच्या ताराबाई पार्क शाखेला पत्र पाठवून निवारा ट्रस्टने दिलेल्या ठेव पावत्यांची सत्यता तपासून द्यावी, असे कळवले आहे. या पावत्या पुणे लोकमान्यनगर शाखेतून दिल्याचे ट्रस्टने भासवले आहे. त्यामुळे त्या शाखेचे म्हणणे घेऊन पावत्यांबद्दल रितसर माहिती देतो, असे बँकेने पोलिसांना कळवले आहे. परंतु, प्रथमदर्शनी त्यांनी या पावत्या खोट्याच असल्याचे तोंडी स्पष्टपणे सांगितले आहे.
दोन खाती गोठवली...
तक्रारदारांनी ३९०० रुपयांप्रमाणे निवारा ट्रस्टच्या पुणे जनता सहकारी बँकेतील खात्यावर व आर्या इन्व्हेंट कंपनीच्या कॉसमॉस बँकेतील खात्यावर रक्कम भरली होती. त्या दोन्ही खात्यांवर अनुक्रमे १ लाख ४९ हजार व १०४२ रुपये बॅलन्स असल्याचे चौकशीत पुढे आले आहे. ही दोन्ही खाती गोठवली आहेत.