अंबाबाईची महात्रिपूरसुंदरी रूपात पूजा
By Admin | Published: October 8, 2016 01:21 AM2016-10-08T01:21:00+5:302016-10-08T01:25:40+5:30
नवरात्रौत्सवाची सातवी माळ : भाविकांची अलोट गर्दी; तुळजाभवानी देवीची दीपपूजा
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या माळेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची महात्रिपूरसुंदरी देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. रात्री देवीची पालखी बालाजी मंदिराच्या शिखराच्या आकारात काढण्यात आली; तर जुना राजवाड्यातील तुळजाभवानी देवीची दीपपूजा साकारण्यात आली.
देवीच्या तांत्रिक दशमहाविद्यांपैकी सर्वांत लोकप्रिय देवता म्हणजे त्रिपूरसुंदरी. हे महात्रिपूरसुंदरी स्वरूप सर्वसंप्रदायसमावेशक आहे. या स्वरूपात देवी महात्रिपूरसुंदरी ही पंचप्रेतासनास्था अथवा पंचब्रह्मासनास्था अशी कल्पिली जाते.
त्रिपूरसुंदरी चतुर्भुज असून, प्रदक्षिणाक्रमाने पुष्पबाण (गुच्छ), अंकुश, पाश, इक्षुदंड (उसाचा धनुष्य) धारण केले आहे. बऱ्याचदा देवीच्या खांद्यावर अथवा पुष्पगुच्छावर पोपट दाखविला जातो. त्रिपूरसुंदरीच्या उपासनेमध्ये शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य सर्वांचा समन्वय साधल्याने या देवीच्या उपासनेला व्यापकत्व प्राप्त झाले आहे. ही पूजा संजीव मुनीश्वर, आशुतोष जोशी, सुशील कुलकर्णी यांनी बांधली.
दरम्यान, दिवसभरात गण गण गणात दत्त माउली महिला सांस्कृतिक मंडळ, अक्कमहादेवी भजनी मंडळ, जिव्हाई महिला सोंगी भजनी मंडळ, आशीर्वाद प्रस्तुत ‘स्वरसौरभ’तर्फे भावगीते भक्तिगीते; राधिका कालेकर ग्रुपतर्फे पोवाडा, भारूड, जोगवा, ‘स्वरनिनाद’ प्रस्तुत ‘शब्दसुरांच्या झुल्यावर’ या संस्थांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. रात्री अंबाबाईची पालखी बालाजी मंदिराच्या शिखराच्या आकारात काढण्यात आली. खासदार धनंजय महाडिक, अरुंधती महाडिक, आमदार अमल महाडिक, समीर शेठ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील यांच्या हस्ते पालखीपूजन झाले.
सुवर्णपालखी दर्शनासाठी
करवीर निवासिनी श्री अंबाबाईसाठी सोन्याची पालखी बनविण्यात येत आहे. या पालखीचे ८० टक्के काम
पूर्ण झाले असून, शुक्रवारी ही पालखी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. सकाळी आठ वाजता अरुंधती महाडिक यांनी पालखीचे पूजन केले. त्यानंतर खासदार धनंजय महाडिक, भरत ओसवाल यांच्या उपस्थितीत ही पालखी सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतात त्या व्यासपीठावर भाविकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली. यावेळी खासदार महाडिक यांनी सुवर्णपालखीमागील भावना व्यक्त केल्या.
शालू अर्पण
शुक्रवारी पारंपरिक वाद्यांच्या गजरात तिरूमला तिरूपती देवस्थानकडून अंबाबाईला मानाचा शालू अर्पण केला. गुलाबी रंगाच्या शालूवर सोनेरी रंगाच्या कोयऱ्या असून, त्याची किंमत ८९ हजार २०० रुपये आहे. तिरूपती देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी व्ही. दामोदरम व त्यांच्या पत्नी प्रेमलता यांनी हा शालू व खण पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द केला.