विकासकामांचा ‘पूल’; मात्र पाण्याची गळती

By admin | Published: February 6, 2015 12:13 AM2015-02-06T00:13:00+5:302015-02-06T00:46:18+5:30

संपर्क असूनही कचरा उठाव नाही : ड्रेनेज पाईपलाईन होऊनही सांडपाणी रस्त्यावर, बागकाम जोरात

'Pool' of development works; But water leakage | विकासकामांचा ‘पूल’; मात्र पाण्याची गळती

विकासकामांचा ‘पूल’; मात्र पाण्याची गळती

Next

स्वातंत्र्यसैनिक वसाहत प्रभाग म्हणजे उच्चवर्गीय, मध्यवर्गीय व कष्टकरी लोकांचा संमिश्र असा प्रभाग होय. विखुरलेला प्रभाग पुलांच्या माध्यमातून जोडून विद्यमान नगरसेवक भूपाल शेटे यांनी नागरिकांची नाहक होणारी पायपीट थांबविली आहे. प्रभागातील पाण्याचा प्रश्न सोडविला असला तरी, पाण्याच्या गळतीकडे नगरसेवक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, अशी खोचक टिकाही काही नागरिक करत आहेत. स्वातंत्र्यसैनिक वसाहत प्रभाग क्रमांक ७६ चे नेतृत्व भूपाल शेटे हे करत आहेत. प्रभागात सुभाषनगर, वर्षानगर, म्हाडा कॉलनी, वृंदावन पार्क, भारतनगर, पद्मा सोसायटी, स्वातंत्र्यसैनिक वसाहत, राजेंद्रनगर हौसिंग सोसायटी, मोतीनगर, कांजारभाट वस्ती, शिवशिल्प कॉलनी हे प्रमुख भाग येतात. प्रभागात पाण्याची खूप मोठी समस्या होती. पाण्यासाठी अनेकवेळा येथील नागरिकांनी आंदोलन केले होते. भूपाल शेटे यांनी निवडून आल्यानंतर प्रथम पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. सुजन निर्मल अभियानातून एक कोटी २० लाख रुपये खर्च करून मोतीनगर ते राजेंद्रनगरपर्यंत पाण्याची पाईपलाईन जोडण्यात आली. त्यामुळे भारतनगर, म्हाडा कॉलनी, राजेंद्र परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. राजेंद्रनगर ओढ्यामुळे येथील काही भाग वेगळे झाले होते. या ओढ्यामुळे एस. एस. सी. बोर्ड परिसरातून वर्षानगरकडे येण्यासाठी नागरिकांना सुमारे दीड ते दोन किलोमीटरचा लांबचा पल्ला पडत होता. विद्यार्थी व नोकरदारांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने या ठिकाणी पूल व्हावा, अशी मागणी कित्येक वर्षांपासून येथील नागरिक करत होते. मात्र, त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना त्याचा खूप त्रास होत होता. हा प्रश्न सोडविण्यासाठी शेटे यांनी प्रभागात सात ठिकाणी पूल बांधल्याने नागरिकांची समस्या सुटण्यास मदत झाली आहे.
यासह प्रभागात काही ठिकाणी बागेचे काम सुरू केले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा फिरण्याचा व लहान मुलांचा खेळण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. मोतीबाग झोपडपट्टी येथे अंतर्गत रस्ते सिमेंटचे केले आहेत. तसेच शौचालयांची सोय करण्यात आली आहे. तरीही याठिकाणी गटारींचे नियोजन नसल्याने सांडपाणी उघड्यावर सोडण्यात येत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. स्वच्छतेसाठी महानगरपालिकेकडे अपुरे कर्मचारी आहेत. त्यामुळे गटारी साफ होत नसल्याने नागरिकांची मोठी ओरड होत होती. त्यामुळे नगरसेवकांनी प्रभागातील गटार पद्धत बंद करून त्या सांडपाणी थेट ड्रेनेज पाईपलाईनशी जोडल्या आहेत.
मात्र, अजूनही काही भागांतील कचरा उठाव होत नाही. तसेच मोतीनगर येथे पाण्याची मोठी गळती लागलेली आहे. या पाईपमधून सतत मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने हजारो लिटर पाणी वाया जाते, याकडे नगरसेवकांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. प्रभागात नगरसेवकांचा संपर्क असल्याने समाधान व्यक्त होत आहे.


प्रभागात सुमारे ११ कोटींची विकासकामे केले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने येथील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावला आहे. प्रभागात मी सात पूल बांधल्याने विखुरलेला प्रभाग जोडण्यास मदत झाली आहे. मोतीनगर येथील शौचालयाचा प्रश्न मार्गी लावला आहे. यासह प्रभागातील ड्रेनेज पाईपलाईनचे काम पूर्ण झाली आहेत. दोनवेळ प्रभागात पाणी येते.
- भूपाल शेटे, नगरसेवक

उद्याचा प्रभाग क्रमांक - ४६ महालक्ष्मी मंदिर

Web Title: 'Pool' of development works; But water leakage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.