मुरगूड-वाघापूरला जोडणारा पूल सापडला वादाच्या भोवऱ्यात
By admin | Published: March 31, 2015 10:27 PM2015-03-31T22:27:18+5:302015-04-01T00:05:11+5:30
प्र्रशासनाच्या विरोधात संताप : रस्त्यामध्ये शेती जात असल्याने विरोध; योग्य मोबदल्याशिवाय काम करू न देण्याचा इशारा
अनिल पाटील - मुरगूड -कागल - भुदरगड तालुक्याला जोडणाऱ्या मुरगूड-वाघापूर दरम्यान वेदगंगा नदीवरील पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे; पण त्या पुलाला जोडण्यात येणाऱ्या रस्त्यामध्ये मुरगूड आणि वाघापूर या दोन गावांतील शेतजमीन मोठ्या प्रमाणात जात असल्याने शेतकऱ्यांनी याला विरोध केला आहे. विश्वासात न घेता मनमानी काम करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप असल्याने वाघापूर पूल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
संस्थानकालीन बाजारपेठ आणि प्रसिद्ध जनावरांचा बाजार मुरगूडमध्ये भरत असल्याने भुदरगड तालुक्यातील गारगोटी, कडगाव आणि तळ कोकणातील लोकांचा मुरगूडशी संपर्क साधण्यासाठी मुदाळतिट्टा मार्गे यावे लागते. दरम्यान, वाघापूर आणि मुरगूड यांच्यामध्ये वेदगंगा नदीवर पूल बांधला, तर या सर्वांचे २० ते ३० कि. मी. जादाचे अंतर कमी होईल, शिवाय वेळही वाचेल. यासाठी लोकांनी पुलाची मागणी उचलून धरली. लोकप्रतिनिधींनीही या पुलासाठी प्रयत्न करून शासनाकडून निधी आणला.
पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली. अगदी युद्धपातळीवर काम होत अल्पावधीतच ते काम पूर्णत्वाकडे आले आहे; पण प्रशासनाने त्या पुलाला जोडणारे मुरगूड व वाघापूरकडील रस्त्यांबाबत आपले धोरण गुलदस्त्यात ठेवले.
पुलाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने रस्त्याच्या कामासाठी लगबग सुरू झाली; पण ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ता जातो त्यांनी मात्र त्याला प्रखर विरोध केला आहे. आराखड्यामध्ये ज्या पद्धतीने रस्ता दाखविला आहे, तसा न करता पुलाच्या अगदी दोन्ही बाजूला थोड्याच अंतरावर मोठाले ‘यू’टर्न वळण ठेवल्याने वाहतुकीसाठी धोका पोहोचणार आहे. आराखड्यामध्ये दाखवलेल्या रस्त्याबाबत बाधित शेतकऱ्यांबरोबर प्रशासनाने कोणतीही चर्चा केली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये असंतोष असून, त्यांनी दोनवेळा पुलाचे काम बंद पाडले आहे. आता पुन्हा एकदा बांधकाम विभागाचे अधिकारी, कागल व भुदरगडचे आमदार यांच्या समवेत शेतकऱ्यांशी चर्चा होणार असून, आपल्याला न्याय मिळत नाही, योग्य मोबदला मिळत नाही, तोपर्यंत हे काम करू द्यायचे नाही, अशा पवित्र्यात शेतकरी आहेत.
दत्तमंदिराला धोका
वेदगंगा नदीकाठावर मुरगूडचे श्रद्धास्थान असलेल्या दत्तमंदिराला अगदी लागूनच या रस्त्याच्या भरावाचे काम सुरू आहे. जमिनीपासून ४० फूट भराव वरती जाणार असल्याने मंदिराला धोका पोहोचणार आहे. त्यामुळे रस्ता मंदिरापासून दूर घ्यावा, अशी मागणी तरुण व ग्रामस्थांनी केली आहे.