शिवभोजन थाळीने भागतेय गरीब, गरजूंची भूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:22 AM2021-04-18T04:22:13+5:302021-04-18T04:22:13+5:30
कोल्हापूर : वयाची सत्तरी पार केलेली भाजी विक्रेते, मोठमोठ्या बंगल्यांचे सिक्युरिटी गार्ड ज्यांनी कित्येक दिवस आपल्या घराचे, पोराबाळांचे ...
कोल्हापूर : वयाची सत्तरी पार केलेली भाजी विक्रेते, मोठमोठ्या बंगल्यांचे सिक्युरिटी गार्ड ज्यांनी कित्येक दिवस आपल्या घराचे, पोराबाळांचे तोंडही पाहिले नाही, रुग्णालयात दाखल झालेल्या गरोदर माता, त्यांचे नातेवाईक, परगावहून आलेले प्रवासी, लक्ष्मीपुरीत राबणारे हमाल, कामगार, बेवारस लोक, फिरस्ते, भिकारी, अशा सगळ्या घटकांतील नागरिकांच्या पोटाची भूक शिवभोजन थाळीतून भागवली जात आहे. मोफत दिल्या जाणाऱ्या अन्नामुळे त्यांना उपाशीपोटी झोपावे लागत नाही, हेच सरकारचे यश म्हणावे लागेल.
राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे १ मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याकाळात अनेक व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने गरीब, गरजूंसाठी राज्य शासनाने महिन्याभरासाठी शिवभाेजन थाळी मोफत दिली आहे. आता जिल्ह्याला रोज ६ हजार थाळ्यांना मान्यता देण्यात आली आहे; पण रांगेत पाहिले, तर अगदी दुचाकी वाहनांवरून आलेले, कमावत्या कुटुंबातील, चांगले कपडे घातलेले लोकही दिसत आहेत. ही थाळी खरंच गरजूंपर्यंत पोहोचते का, की त्याचा इतर लोकच लाभ घेतात, हे पाहण्यासाठी शनिवारी दुपारी शहरातील सावित्रीबाई फुले हॉस्पिटल व मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील शिवभोजन केंद्रांवर ‘लोकमत’च्या वतीने रिॲलिटी चेक करण्यात आले. यावेळी अनेक लाेक चांगल्या कुटुंबातील, कमावते असले तरी काही ना काही अडचणींमुळे ते घरी जाऊ शकत नाहीत, रोज हॉटेलचे महागडे अन्न परवडत नाही, गरजेची बाब म्हणून शिवभोजन थाळीचा लाभ घेत असल्याचे दिसून आले.
पूर्वी थाळींची संख्या आणि वेळही कमी होती, जेवण लवकर संपायचे, उपाशी बसायची पाळी यायची. त्यामुळे गरीब सगळ्यांच्या आधी येथे येऊन थांबलेले दिसले. वितरणाला सुरुवात झाली की, केंद्राचे लोक शिवभोजन लिहिलेल्या फलकासमोर लाभार्थ्याचे छायाचित्र, त्याचा मोबाइल नंबर घेऊन जेवणाची पाकिटं देत होते.
--
वेळ : सकाळी १०.३० वा. सावित्रीबाई फुले हॉस्पिटलजवळील अण्णा शिवभोजन केंद्राबाहेर फिरस्ते, भिकारी यांच्यासह हातावरचे पोट असलेल्या कष्टकऱ्यांच्या लांबलचक रांगा लागलेल्या. येथे लक्ष्मीपुरीतील हमाल, भाजी विक्रेते, शिवाजी उद्यमनगरातील कामगार, दवाखान्यात उपचार घेत असलेले रुग्ण, त्यांचे नातेवाईक अगदी तेथे काम करणाऱ्या आया, मावशी, अशा वेगवेगळ्या घटकांतील लोक जेवण घेऊन जात होते. अगदी सफारी, टी-शर्ट घालून गाडीवरून आलेले लोकही रांगेत होते. त्यांच्याशी गप्पा मारताना लक्षात आले की, कुटुंबियांना कोरोना होईल, या धास्तीने ते कामाच्या िठिकाणीच राहत होते. काही लोक परगावचे होते. हॉटेलचे ६०-७० रुपयांचे जेवण परवडत नाही.
---
वेळ : सकाळी ११.३० वा.
परीख पुलाजवळील शिवभोजन केंद्रासमोरही भल्यामोठ्या रांगा, मुख्यत्वे परगावहून आलेल्या नागरिकांची गर्दी. राजारामपुरीतील कामगार ज्यांचा सध्या रोजगार बंद आहे. गार्ड, रेल्वेतून कोल्हापुरात येणारे फिरस्ते, महिला यांच्यासाठी हे शिवभोजन केंद्रच मोठे आधार होते. आम्हाला आता रोजगार नाही, मालक जबाबदारी घ्यायला तयार नाही, दुकाने बंद. या मोफत जेवणामुळे किमान एक वेळ तरी आम्ही पोटभर जेवू शकतो याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
--
वेळ : दुपारी २.३० वा. गंगावेश येथील सर्वाधिक गर्दी असलेल्या केंद्रावर जवळपास सर्व थाळ्यांचे वितरण झाले होते. केंद्रचालक धैर्यशील आयरेकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले की, अनेक नागरिकांकडे थाळीसाठी आकारण्यात आलेले ५ रुपयेसुद्धा नसायचे. त्यामुळे अनेकदा आम्ही मोफत जेवण दिले आहे. लोकांना कामधंदा, रोजगार नसताना जेवण तरी मिळते. त्यामुळे शासनाने मोफतचा निर्णय घेऊन खूप चांगले पाऊल उचलले आहे.
-
आमचा सिक्युरिटी गार्डचा व्यवसाय आहे, पाच- सहा कर्मचारी कित्येक दिवस घरी गेलेले नाहीत. एवढ्या लोकांसाठी रोज हॉटेलच्या जेवणाचा खर्च परवडत नाही. त्यांच्यासाठी मी ही थाळी नेत आहे.
-भारत भोसले
--
मुलगा, सून शिंगणापूरला राहतात, मी लक्ष्मीपुरीत रोज लोकांची भाजी विकत बसते. गावाकडं जाणं परवडत नाही. रोज हे शिवभोजन घेऊन जेवते.
-शांताबाई घोरपडे
--
शासनाने ही थाळी सुरू करून गरीब, गरजूंना खरंच दिलासा दिला आहे. त्याचा लाभ योग्य व्यक्तींना मिळतो याचे आम्हाला समाधान आहे. विशेषत: अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, रुग्ण, नातेवाईक यांची थाळीमुळे मोठी सोय होते.
-अमित सोलापूरे (केंद्रचालक)
--
मुलगी दवाखान्यात ॲडमिट आहे. गावाकडून डबाच आला नाही. या थाळीमुळे आमची गैरसोय झाली नाही. नाही तर उपाशीच राहावं लागलं असतं.
-मोहन पवार
-