कमी जागांमुळे कोल्हापुरात पोलिस भरती प्रक्रियेला थंडा प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 01:17 PM2023-01-04T13:17:42+5:302023-01-04T13:18:06+5:30

पोलिस मुख्यालयातील मैदानावर पहाटे पाचपासून शारीरिक चाचणीला सुरुवात

Poor response to police recruitment process in Kolhapur due to less seats | कमी जागांमुळे कोल्हापुरात पोलिस भरती प्रक्रियेला थंडा प्रतिसाद

छाया : आदित्य वेल्हाळ

googlenewsNext

कोल्हापूर : जिल्हा पोलिस दलातील रिक्त २४ जागांसाठी मंगळवारी (दि. ३) पहाटेपासून पोलिस मुख्यालयातील मैदानावर भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ८०० पैकी केवळ ३८३ उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी हजेरी लावली. उपलब्ध जागांची कमी संख्या आणि राज्यात एकाच जिल्ह्यात भरती प्रक्रियेत सहभाग घेण्याची संधी असल्यामुळे कोल्हापुरातील भरती प्रक्रियेला थंडा प्रतिसाद मिळाला असावा, असा अंदाज पोलिस अधिकाऱ्यांनी वर्तवला.

राज्य सरकारने सुमारे १८ हजार पोलिसांची पदे भरण्यासाठी परवानगी दिल्यानंतर राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये पोलिस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्यातील पोलिस भरतीची संख्या मोठी असली तरी, कोल्हापूर जिल्ह्यात मात्र केवळ २४ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी ३२३२ ऑनलाइन अर्ज आले होते. त्यापैकी ३२१६ पात्र उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी बोलावले आहे. पहिल्या दिवशी ८०० उमेदवारांना बोलावले होते. त्यापैकी केवळ ३८३ उमेदवार मंगळवारी उपस्थित राहिले.

पोलिस मुख्यालयातील मैदानावर पहाटे पाचपासून शारीरिक चाचणीला सुरुवात झाली. बायोमेट्रिक हजेरीद्वारे प्रवेश दिल्यानंतर वजन, उंची आणि छातीची मापे घेण्यात आली. गोळाफेकीनंतर १६०० मीटर आणि १०० मीटर धावण्याची चाचणी झाली. सीसीटीव्ही कॅमेरे आणि अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली भरती प्रक्रिया पार पडली.

४१७ उमेदवारांची दांडी

यंदा राज्यात कोणत्याही एकाच जिल्ह्यात उमेदवारांना भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. सुरुवातीला याची कल्पना नसल्याने अनेक उमेदवारांनी विविध जिल्ह्यांमध्ये अर्ज भरले. नियमात स्पष्टता येताच उमेदवारांनी जादा जागा उपलब्ध असलेल्या जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रियेत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापुरात केवळ २४ जागांची उपलब्धता असल्यामुळे अनेक उमेदवारांनी भरती प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे.

पहिल्या दिवशी भरती प्रक्रियेला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाला. राज्यात कोणत्याही एकाच जिल्ह्यात भरती प्रक्रियेत सहभागी होण्याच्या नियमामुळे उमेदवारांनी जादा जागा असलेल्या जिल्ह्यांना प्राधान्य दिले असावे. - प्रिया पाटील - पोलिस उपअधीक्षक
 

Web Title: Poor response to police recruitment process in Kolhapur due to less seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.