डॉक्टरांच्या अपुऱ्या संख्येमुळे रुग्णांची हेळसांड-: पन्हाळा तालुक्यातील चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 11:55 PM2019-05-15T23:55:58+5:302019-05-15T23:57:15+5:30
पन्हाळा तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे त्याच्या अंतर्गत ४0 उपकेंद्रे, जिल्हा परिषदेचे दोन फिरते दवाखाने, सहा रुग्णवाहिका व १०८ च्या तीन रुग्णवाहिका यांच्या माध्यमातून तालुक्याच्या डोंगराळ आणि दुर्गम भागात आरोग्य यंत्रणा राबविली
नितीन भगवान ।
पन्हाळा : पन्हाळा तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे त्याच्या अंतर्गत ४0 उपकेंद्रे, जिल्हा परिषदेचे दोन फिरते दवाखाने, सहा रुग्णवाहिका व १०८ च्या तीन रुग्णवाहिका यांच्या माध्यमातून तालुक्याच्या डोंगराळ आणि दुर्गम भागात आरोग्य यंत्रणा राबविली जात आहे. त्याचवेळी एम.बी.बी.एस. झालेल्या डॉक्टरांची संख्या कमी, प्राथमिक आरोग्य कें द्रात होणारी रुग्णांची आर्थिक पिळवणूक, फिरत्या दवाखान्यांचे नसलेले अस्तित्व, यामुळेही रुग्णांची हेळसांड होत आहे.
बोरपाडळे व केखले प्राथमिक आरोग्य केंद्र वगळता अन्य केंद्रांवर रुग्णांची संख्या फारशी नाही. याला कारण एम.बी.बी.एस. डॉक्टरांची संख्या कमी आहे. एम.बी.बी.एस. डॉक्टर तालुक्यात नऊ आहेत. त्यापैकी दोन बाहेरगावी अतिरिक्तकार्यभारावर आहेत, तर परिचारिका केवळ १२ आहेत, तर आरोग्यसेवक मंजूर पदे ५१ असून, ४५ इतके कामावर आहेत. सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रे सुसज्ज व चांगल्या इमारतींत आहेत; पण कर्मचाऱ्यांच्या राहण्याच्या गैरसोयीच्या इमारती असल्याने बहुतेक ठिकाणी रात्री आरोग्य केंद्रे कुलूपबंद असतात. यात पडळ परिसरातील उपकेंदे्र आघाडीवर आहेत. लोकप्रतिनिधी व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य दक्ष असल्याने औषधे पुरेशी उपलब्ध आहेत, तर पन्हाळा तालुका डोंगराळ व दुर्गम असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्पदंश लस ठेवावी लागत असून, त्याचा साठा कायमस्वरूपी शिल्लक असतो.
गोवर, रुबिला लसीकरण यावर्षी ९९ टक्केकेले आहे, तर कुटुंब नियोजन ८५ टक्के केले गेले आहे. पावसाळा व उन्हाळ्यात साथीचे रोग आल्यास तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असल्यास कोल्हापूर शासकीय दवाखान्याचा आधार घेतला जातो. प्राथमिक आरोग्य केंद्रावर रुग्णवाहिकेंची सोय चांगली आहे, तर १०८ रुग्णवाहिका जोतिबा, कळे, कोडोली येथे कार्यरत आहेत. त्यापैकी बाजारभोगाव येथील १०८ रुग्णवाहिका राजकीय हस्तक्षेप होत कळे येथे नेल्याने बाजारभोगाव व येथील दुर्गम गावातील रुग्णांची गैरसोय होत आहे. बहुतेक उपकेंद्रांवर लसीकरणाच्या नावाखाली दर्शविणारी अनुपस्थिती, तर कोडोली उपकेंद्रावर गेल्या तीन वर्षांपासून तंत्रज्ञ नसल्याने एक्स-रे मशीन धूळ खात पडलेली आहे.
बोरपाडळे आरोग्य केंद्र सेवेत अग्रेसर
बाजारभोगाव, बोरपाडळे, कळे, केखले, कोतोली, पडळ या सहा ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. तालुक्यात १११ गावे व वाड्यावस्त्या आहेत. जिल्हा परिषद फिरते दवाखाने, आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे या सर्वांची संख्या ४८ इतकी आहे. पन्हाळा व कोडोली या ठिकाणी शासकीय दवाखाने आहेत. यापैकी बोरपाडळे प्राथमिक आरोग्य केंद्राला राष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्रात दुसरा क्रमांक, तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळालेला आहे. बोरपाडळे प्राथमिक आरोग्य केंद्राने चांगली कामगिरी बजावत २०१५ मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील आय.एस.ओ. समजले जाणारे एन.ए.बी.एच. हे मानांकन प्राप्त केले आहे. विविध आरोग्य योजना राबविण्यात पन्हाळा तालुका आघाडीवर आहे. मात्र, मुलींचा जन्मदर अजूनही म्हणावा इतका सुधारलेला नाही.
केखले प्राथमिक आरोग्य केंद्र तेथील डॉ. पाटील यांच्या चांगल्या वर्तणुकीमुळे नावारूपास येत आहे. रोज सरासरी २५० ते ३०० रुग्ण या ठिकाणी उपचारांसाठी येत असतात.