पिराचीवाडीतील किल्ल्याच्या बुरूजाची दुरवस्था
By admin | Published: October 1, 2015 11:22 PM2015-10-01T23:22:42+5:302015-10-01T23:22:42+5:30
इतिहासप्रेमींतून नाराजी : ऐतिहासिक वास्तूची डागडुजी व्हावी
बोरवडे : कागल तालुक्यातील पिराचीवाडी येथील किल्ल्याची तटबंदी आणि बुरूज आजही इतिहासाची साक्ष देत खंबीरपणे उभा आहे. मात्र, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि नागरिकांची उदासीनता यामुळे किल्ल्याच्या बुरूजांची पूर्ण दुरवस्था झाल्याने हा बुरूज अखेरच्या घटका मोजत आहे. या ऐतिहासिक वास्तूची डागडुजी व्हावी, अशी मागणी इतिहासप्रेमींतून होत आहे.
बिद्री साखर कारखान्याच्या ईशान्येला आठ किलोमीटर अंतरावर असलेले पिराचीवाडी हे साधारण दीड हजार लोकवस्तीचे उंचवट्यावर वसलेले गाव. छत्रपती शिवरायांच्या काळात कसबा वाळवे येथील पराक्रमी सेनापती सर्जेराव घाटगे यांच्याकडे या किल्ल्याचे वतन होते. पीर नावाचा फकीर गावामध्ये तसेच परिसरामधून भिक्षा मागून फिरत होता. त्यामुळे या गावचे नाव पिराचीवाडी पडले.
पिराचीवाडी हे ठिकाण उंच ठिकाणी वसल्याने आजूबाजूच्या परिसरावर नियंत्रण ठेवण्यासाठी याची निर्मिती केली होती. या किल्ल्यावर तबेला, पाणी पिण्यासाठी विहिरी, तलाव आहेत. किल्ल्याची तटबंदी तब्बल दहा फूट रुंद असून, या तटबंदीवरून तोफा सहजपणे फिरविता येईल, अशी रचना केल्याचे दिसून येते. १९६० पर्यंत या किल्ल्याचे सात बुरूज शिल्लक होते. त्यापैकी बदलत्या काळात सध्या एकच बुरूज शिल्लक आहे. खंदकाच्या बाजूनेही सर्व बाहेरील बाजूंनी मोठी संरक्षक भिंत होती. ब्रिटिश काळामध्ये इंग्रजांनी या किल्ल्याची दुरवस्था केली. निसर्गरम्य अशा या ऐतिहासिक वास्तूचे दर्शन घेण्यासाठी शाळेच्या सहली येत होत्या. इतिहासप्रेमी पर्यटक भेट देत होते; पण किल्ल्याच्या उरल्यासुरल्या आठवणींही बुरुजाच्या दुरवस्थेमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. इतिहासाची साक्ष देणाऱ्या या किल्ल्याच्या स्मृती जपण्यात याव्यात, अशी इतिहासप्रेमींतून मागणी होत आहे. (वार्ताहर)