कऱ्हाड-बेळगाव मार्गाबाबत सकारात्मक
By admin | Published: August 29, 2014 12:53 AM2014-08-29T00:53:34+5:302014-08-29T00:54:13+5:30
सदानंद गौडा : दोन वर्षांचा कालावधी लागणार
संकेश्वर : कऱ्हाड-बेळगाव (संकेश्वर-निपाणी मार्गे) रेल्वेमार्गाबाबत सरकार सकारात्मक विचार करेल. मात्र, या योजनेस थोडा कालावधी लागेल, असे मत केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी सांगितले.
चिकोडी दौऱ्यावर ते आले असता विलास घोरपडे यांनी त्यांची चिकोडीत भेट घेऊन रेल्वे मार्गाचे निवेदन सादर केले. त्यावेळी मंत्री सदानंद गौडा बोलत होते.
निवेदनात म्हटले आहे की, १९०३ पासून भागातील जनता रेल्वेची मागणी करीत आहे. ब्रिटिश आमदानीत मद्रास मराठा सदर्न रेल्वे खात्याने संकेश्वरमध्ये आऊट एजन्सी सुरू केली होती. २०११-१२ च्या रेल्वे अर्थसंकल्पात सर्वेक्षणास मंजुरी मिळाल्यानेच मध्यंतरी पाच्छापुर-संकेश्वर-कोल्हापूर (८५. कि. मी.) आणि बेळगाव-संकेश्वर-निपाणी-कऱ्हाड (१९१ कि. मी.) अशा दोन मार्गांचा सर्व्हे झाला आहे.
देशातील इतर राज्यांच्या मानाने कर्नाटकात कमी अंतरांचे रेल्वेमार्ग आहेत. नवीन मार्गास ५० टक्के केंद्र, तर ५० टक्के राज्य सरकारचा आर्थिक सहभाग असल्याने राज्याच्या वाट्याला येणाऱ्या निधींच्या तरतुदींबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना लिहिलेले पत्र आणि त्यांच्या सचिवाकडून आलेले पत्र घोरपडे यांनी रेल्वेमंत्री गौडांना दाखवून मध्ये रेल्वे पुणेतर्फे कऱ्हाड-बेळगाव सर्व्हेचा तपशील मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिला.
यावेळी निवेदन स्वीकारून मंत्री सदानंद गौडा म्हणाले, केवळ आश्वासन देऊन लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा मागणीनुसार शक्य होईल, ती कामे करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
तथापि, कऱ्हाड-बेळगाव मार्गाविषयी किमान दोन वर्षांचा कालावधी लागेल. त्यानंतर या मार्गासंबंधी निश्चित सकारात्मक निर्णय घेऊ, असे रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)