वस्त्रोद्योगासाठी सकारात्मक निर्णय होईल
By admin | Published: July 31, 2016 12:45 AM2016-07-31T00:45:53+5:302016-07-31T00:45:53+5:30
सुरेश हाळवणकर : वस्त्रोद्योगातील मंत्री, आमदारांचे शिष्टमंडळ केंद्रीय मंत्र्यांना भेटणार
इचलकरंजी : यंत्रमाग महामंडळामार्फत शासनाने दोन हजार यंत्रमागांना बिमे द्यावीत, साध्या यंत्रमाग कारखानदारांसाठी विजेच्या दरात सवलत मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तसेच यंत्रमाग उद्योगातील समस्या सोडविण्यासाठी विधिमंडळात लक्षवेधी उपस्थित केली असून, मंगळवारी त्यावर चर्चा होऊन सकारात्मक निर्णय होईल, अशी ग्वाही आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली. तसेच मंदीच्या काळात ट्रेडिंगधारकांनी माणुसकीच्या नात्याने एकमेकांना आधार देण्याच्या उद्देशाने यंत्रमागधारकांना किमान एक पाळी चालावी यासाठी बिमे द्यावीत, असे आवाहनही ट्रेडिंगधारकांना केले.
वस्त्रोद्योगची स्थिती बिकट बनल्यामुळे शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी येथील प्रांत कार्यालय चौकात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या यंत्रमागधारकांच्या आंदोलनस्थळी हाळवणकर यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कारखानदारांच्या समस्यांबाबत चर्चा केली आणि नेहमीच तेजी-मंदीचा सामना करणाऱ्या या उद्योगात येथील उद्योजकांनी अनेक चढ-उतार सहन केले आहेत. त्यातूनही येथील उद्योग स्थिर होऊन तो वाढत गेला आहे. त्यामुळे कारखानदारांनी खचून न जाता या जागतिक मंदीचा सामना करावा, असे आवाहनही केले. तसेच लवकरच वस्त्रोद्योग मंत्री आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील आमदार यांचे शिष्टमंडळ केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांची भेट घेऊन शासनाकडून कापूस खरेदी करून तो सूतगिरण्यांना देऊन त्या सूतगिरण्यांमार्फत काही टक्के सूत थेट कारखानदारांना विक्री करण्याची मागणी करणार असल्याचेही सांगितले. (वार्ताहर)
राजकारण बाजूला ठेवावे
आपल्या शहरातील उद्योगात राजकारण शिरतंय
मालेगाव, भिवंडीसह यंत्रमाग क्षेत्रातील सर्वच ठिकाणी मंदीचे सावट पसरले आहे. मात्र, आपल्या शहरातील या उद्योगात राजकारण शिरल्याने येथील कारखानदारांना नुकसानीचा जास्तच त्रास होत आहे. त्यामुळे उद्योगातील समस्या सोडविण्यासाठी राजकारण बाजूला ठेवावे, असा टोलाही आमदार हाळवणकर यांनी यावेळी लगावला.