पॉझिटिव्ह डॉक्टरांचे अहवाल आले निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 04:14 PM2020-08-11T16:14:39+5:302020-08-11T16:19:33+5:30
मुरगूड शहरातील तीन प्रसिद्ध डॉक्टर आणि एक लॅब टेक्निशियन यांचे कोरोना अहवाल रविवारी सकाळी पॉझिटिव्ह आले होते, तोपर्यंत सोमवारी सकाळी त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची बातमी वाऱ्यासारखी मुरगूड शहरासह परिसरातील गावात पोहचली आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
मुरगूड : शहरातील तीन प्रसिद्ध डॉक्टर आणि एक लॅब टेक्निशियन यांचे कोरोना अहवाल रविवारी सकाळी पॉझिटिव्ह आले होते, तोपर्यंत सोमवारी सकाळी त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची बातमी वाऱ्यासारखी मुरगूड शहरासह परिसरातील गावात पोहचली आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
मागील आठवड्यात शहरात काही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले.त्यांच्या नातेवाईकांनी शहरातील काही खाजगी रुग्णालयात उपचार करून घेतले होते.त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या रुग्णालयातल डॉकटरांना स्त्राव तपासणीसाठी नगरपालिका प्रशासनाने विंनती केली. त्यानुसार शहरातील तीन प्रसिद्ध डॉक्टर आणि एक लॅब टेक्निशियन यांनी २९ जुलैला कागल येथील कोविड सेंटर मध्ये आपले स्त्राव दिले. त्यानंतर ते येथील मंडलिक महाविद्यलयातील अलगिकरण कक्षात होते.
दरम्यान, तांत्रिक कारणास्तव यांचे अहवाल येण्यास वेळ लागत होता. दोन ऑगस्टला या चौघांचे अहवाल प्राप्त झाले. त्यानुसार ते सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. ही बातमी ज्यावेळी शहरात समजली त्यावेळी अनेकांना धक्का बसला. कारण शहरातील आणि परिसरातील शेकडो रुग्ण या डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेले होते.
प्रशासनाने युद्धपातळीवर अशा उपचार घेतलेल्या रुग्णांची यादी बनवण्याचे काम सुरू केले होते.शहरातील तीन प्रसिद्ध डॉक्टर पॉझिटिव्ह आल्याने मोठ्या प्रमाणात समहू संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
दरम्यान, आपले अहवाल येण्यास वेळ लागत असल्याने या चौघांनी एक ऑगस्टला पुण्यातील एका खाजगी लॅबमध्ये आपले स्त्राव दिले होते. त्यांनी जलद तपासणी करून आज सकाळी अहवाल पाठवले. यामध्ये या चौघांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले. ही बातमी त्यांच्या अहवालाच्या फोटोसह सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि शहरातील नागरिकांसह परिसरात संभ्रम निर्माण झाला.
आपले अहवाल निगेटिव्ह आले असले तरी कोणताही धोका नको म्हणून या चौघांनी कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. सद्या यांना कोणताही त्रास नाही. पण तरीही आठ ते दहा दिवस लोकांच्या पासून दूर राहण्याचा निर्णय त्यांनी कळवला आहे.
आपण कायमच प्रशासनाला सहकार्य करू आणि नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्या डॉक्टरांनी केले आहे. पण एक दोन दिवसात पॉझिटिव्ह-निगेटिव्हचा हा खेळ मात्र सर्वसामान्यांना गोंधळात टाकणारा आहे हे मात्र नक्की.