वस्त्रोद्योगातील समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:26 AM2021-02-16T04:26:55+5:302021-02-16T04:26:55+5:30

(फोटो) मुंबई / इचलकरंजी : वस्त्रोद्योग, यंत्रमाग व हातमागधारकांच्या विविध मागण्यांचा आढावा घेऊन या मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यशासन सकारात्मक असून, ...

Positive to solve textile problems | वस्त्रोद्योगातील समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक

वस्त्रोद्योगातील समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक

Next

(फोटो)

मुंबई / इचलकरंजी : वस्त्रोद्योग, यंत्रमाग व हातमागधारकांच्या विविध मागण्यांचा आढावा घेऊन या मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यशासन सकारात्मक असून, यासाठी लवकरच कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच यंत्रमाग उद्योजकांच्या कर्जावरील व्याजदरात ५ टक्के सवलतीसाठी जे अर्ज दाखल झालेले आहेत, त्या सर्व अर्जांची मार्च २०२१ पर्यंत निर्गत करून त्यांना अनुदान देण्यात येईल, असे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात वस्त्रोद्योग, यंत्रमाग व हातमागधारकांच्या विविध संघटनांनी शेख यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या मांडल्या. त्यावेळी शेख बोलत होते. यावेळी वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार रईस शेख, विभागाचे सचिव पराग जैन आदी उपस्थित होते. बैठकीत सहकारी संस्थांना बिनव्याजी कर्ज देणे, प्रकल्प अहवालास मान्यता देणे, कर्जाची परतफेड करण्यासाठी मुदतवाढ, सूतगिरण्यांना कापूस गाठीसाठी १० टक्के अनुदान देणे, सहकारी सूतगिरण्यांना वीजदरातील सूट तसेच वीज बिलात सवलत, अतिरिक्त जमिनीची विक्री करण्याची परवानगी देणे, यंत्रमाग सहकारी संस्थांना एकरकमी तडजोड (वन टाईम सेटलमेंट योजना) राबविणे, साध्या यंत्रमागाचा दर्जा वाढविण्यासाठी धोरण तयार करणे, राष्ट्रीय सहकारी विकास निगम योजनेसाठी प्रस्ताव पाठविणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. मंत्री शेख म्हणाले, सहकारी सूतगिरण्यांनी सौरऊर्जेसाठी खासगी सहभाग घेण्याचा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. वीज दर व वीजबिलातील सवलतीसंदर्भात ऊर्जामंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. एकरकमी तडजोड योजनेसंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईल. तसेच कापूस खरेदीसाठी अनुदान तसेच अतिरिक्त जमीन विक्रीसंदर्भात सविस्तर अहवाल विभागाने सादर करण्याचे निर्देशही दिले.

वस्त्रोद्योग राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले, सहकारी सूतगिरण्यांना बिनव्याजी कर्जासंदर्भात शासन सकारात्मक विचार करेल. तसेच प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीत राज्यशासन व वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या प्रतिनिधींचा समावेश असावा.

यावेळी आमदार आवाडे यांनी विविध समस्या मांडल्या, बैठकीस

वस्त्रोद्योग आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, रेशीम संचालक भाग्यश्री बानायत, वस्त्रोद्योग महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक रामचंद्र मराठे, ए. बी. चालुक्य, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे चेअरमन सतीश कोष्टी, ए. डी. दिवटे, एस. ए. कदम, श्रीकांत हजारे, शिवाजी रेडेकर, रफिक खानापुरे, नारायण दुरुगडे, खासगी यंत्रमाग संघटनेचे उपाध्यक्ष उल्हास सूर्यवंशी, विजय निमते आदी उपस्थित होते.

चौकट

'सट्टेबाजार' संदर्भातही सूचना

सूत दरातील सट्टेबाजार व दर या संदर्भात वजनमाप निरीक्षकांसह संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देतानाच या संदर्भात तक्रार आल्यास संबंधित व्यापाऱ्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात येत आहेत, असेही मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

(फोटो ओळी) मुंबईत वस्त्रोद्योगातील अडचणीसंदर्भात वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार रईस शेख, विभागाचे सचिव पराग जैन, वस्त्रोद्योग आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, रेशीम संचालक भाग्यश्री बानायत, वस्त्रोद्योग महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक रामचंद्र मराठे, ए. बी. चालुक्य आदी उपस्थित होते.

Web Title: Positive to solve textile problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.