‘आरटीओ’मध्ये एजंट पोलिसांच्या ताब्यात
By admin | Published: January 30, 2015 11:55 PM2015-01-30T23:55:14+5:302015-01-31T00:02:04+5:30
खळबळ : अनधिकृत प्रवेश करताना कारवाई
कोल्हापूर : येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात वारंवार प्रवेश करू पाहणाऱ्या दिलीप माने या व्यक्तीस बंदोबस्तावरील पोलिसांनी आज, शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. या अचानक केलेल्या कारवाईमुळे ‘दलाल मुक्ती’च्या कारवाईच्या धसक्याने एजंटांमध्ये एकच खळबळ माजली. अधिक चौकशी करता माने यांच्याकडे ज्याचे काम आहे त्या व्यक्तीचे अॅथॉरिटी पत्र नव्हते, त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. राज्याच्या परिवहन आयुक्तांनी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालये ‘दलाल मुक्त’ करण्याचे फर्मान सोडले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांत ज्याच्याजवळ एखाद्या संस्था, व्यक्ती यांचे काम करण्याचे अॅथॉरिटी पत्र आहे व एकाच कामासंदर्भात एकाच व्यक्तीला हे अॅथॉरिटी पत्र दाखवून काम करण्यासाठी कार्यालयात प्रवेश देण्यात येत आहे. ज्यांच्याकडे अॅथॉरिटी पत्र नाही व वारंवार कार्यालयात प्रवेश करत आहेत, अशा एजंटांना प्रवेशद्वारावर रोखण्यात येते.
प्रादेशिक परिवहन कार्यालयात एखादी व्यक्ती वारंवार येत असेल व त्यांच्याकडे एखाद्या संस्था, व्यक्ती यांचे अॅथॉरिटी पत्र नसेल, तर त्या व्यक्तीला बाहेर काढण्याचे आदेश कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यांच्यावर ‘सरकारी कामात अडथळा आणला’ म्हणून गुन्हा नोंदविण्यात येईल.
- लक्ष्मण दराडे
प्रादेशिक परिवहन अधिकारी,