प्रभागरचनेबाबत आज निर्णयाची शक्यता

By admin | Published: May 3, 2016 12:07 AM2016-05-03T00:07:49+5:302016-05-03T00:40:20+5:30

निवडणूक आयोगाची बैठक : नगरपालिका निवडणुका बहुसदस्यीय की एकसदस्यीय; इच्छुकांमध्ये संभ्रमावस्था

The possibility of decision regarding Prabhakrishna | प्रभागरचनेबाबत आज निर्णयाची शक्यता

प्रभागरचनेबाबत आज निर्णयाची शक्यता

Next

संदीप बावचे --जयसिंगपूर --नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या जिल्ह्यातील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी बहुसदस्यीय की एकसदस्यीय प्रभागरचना होणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे़ मंगळवारी (दि़ ३ मे) निवडणूक आयोगाने मुंबई येथे प्रशासकीय यंत्रणेची बैठक बोलावली आहे़ यामध्ये बहुसदस्यीय की एकसदस्यीय प्रभागरचना याबाबत चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे़ यामुळे या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे़
येत्या डिसेंबरमध्ये नगरपालिकांच्या मुदती संपणार आहेत़ त्यामुळे नोव्हेंबर २०१६ मध्ये नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाला निवडणूक कार्यक्रम घेणे क्रमप्राप्त आहे़ याची तयारी एप्रिल २०१५ पासून सुरू करण्यात आली आहे़ त्यानुसार नगरपालिका शहरातील लोकसंख्येच्या आधारे प्रभागरचना करण्याकरिता प्रारूप नकाशा गुगल मॅपवर टाकण्यासाठी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना यावेळी प्रशिक्षण देण्यात आले होते़ गेल्या दहा वर्षांत वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता नगरसेवकांची संख्या वाढणार याचीही शक्यता गृहीत धरण्यात आली होती़
मार्च २०१६ मध्ये जनगणना आकडेवारीनुसार व वाढीव लोकसंख्येच्या आधारे जिल्ह्यातील प्रत्येक पालिकेकडून जिल्हा प्रशासनाकडे अहवाल पाठविला आहे़ यानुसार प्रत्येक नगरपालिकेकडे किमान एक ते दोन सदस्यसंख्या वाढणार आहेत. शिवाय एक सदस्यीय प्रभागरचनेनुसारच हा अहवाल तयार करण्यात आला आहे़
सन २०११ मध्ये झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुका या बहुसदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे झालेल्या होत्या़ मतदारसंख्या वाढल्याने त्यावेळी प्रचार करताना उमेदवारांची दमछाक झाली होती़ सत्तेवर आलेल्या सरकारकडून पालिकेच्या निवडणुका एकसदस्यीय प्रभाग रचनेनुसार होतील, असे जाहीर केले होते़; पण गेल्या सहा महिन्यांतील घडामोडी पाहता यामध्ये बदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ पुन्हा बहुसदस्यीय प्रभागरचना होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे़ आयोगाने प्रभागरचनेबाबत गोपनियता ठेवल्याने इच्छुकांमध्ये संभ्रमावस्था आहे़

पालिकांकडून गटानुसार नकाशाची माहिती निवडणूकआयोगाकडे
सध्या नगरपालिकांकडून गटानुसार नकाशाची माहिती निवडणूकआयोगाकडे पाठविण्यात आली आहे़ येत्या जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रभाग रचनेच्या कामास सुरुवात होण्याचे संकेत आहेत़

Web Title: The possibility of decision regarding Prabhakrishna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.