हॉकी संघटनेतील वाद उफाळण्याची शक्यता
By admin | Published: March 21, 2015 12:19 AM2015-03-21T00:19:16+5:302015-03-21T00:19:26+5:30
आज बैठक : हॉकी बचाव अभियान समिती आक्रमक; लाईन बाजार येथे सायंकाळी आयोजन
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा हॉकी संघटनेने वरिष्ठ गटातील खुल्या स्पर्धा गेली चार वर्षे घेतलेल्या नाहीत. त्यामुळे वरिष्ठ गटातील खेळाडूंचे राज्य, राष्ट्रीय स्तरावर खेळण्याचे स्वप्न स्वप्नच राहणार असल्याने कोल्हापूरची हॉकीची परंपरा टिकविण्यासाठी लाईन बाजार येथे आज, शनिवारी हॉकी बचाव अभियान समितीच्यावतीने बैठकीचे आयोजन केले आहे.
वरिष्ठ गटातील स्पर्धा न झाल्याने खेळाडूंची राज्य, राष्ट्रीय पातळीवर निवड झाली नाही. परिणामी, गुणवत्ता असूनही खेळाडूंना स्पर्धांतून चमक दाखविता आली नाही. हॉकी वाचविण्यासाठी लाईन बाजार येथे पद्मापथक, छावा, पोलीस बॉईज, पोलीस संघातील आजी-माजी खेळाडूंनी एकत्रित प्रयत्न सुरू केले. लाईन बाजार येथील महापालिका मैदानावर या परिसरातील हॉकी खेळणारी तरुण मंडळे आहेत. मात्र, जिल्हा हॉकी संघटनेने वरिष्ठ गटातील एकही स्पर्धा गेल्या चार वर्षांत घेतली नसल्याने येथील तरुणांना स्पर्धा खेळण्यास वाव मिळत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा लाईन बाजार येथील महापालिकेच्या मैदानात हॉकीचे वैभव पाहण्यास मिळावे व यासाठी जिल्हा संघटनेनेही येथील खेळाडू व संघटकांना सदस्यपदासाठी संधी द्यावी, अशी मागणी येथील खेळाडूंकडून होत आहे. याकरिता ही बैठक आयोजित केली आहे. यातून ध्यानचंद स्टेडियमवर स्पर्धा न होता, त्या लाईन बाजार येथेही व्हाव्यात, याकरिता प्राधान्य द्यावे.
याचबरोबर हॉकी इंडियाने मान्यता दिलेल्या संघटनेत नवीन सदस्यांना संधी द्यावी, या मागण्यांचा ऊहापोह होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एका बाजूला लाईन बाजार येथील हॉकी मंडळे व एका बाजूला जिल्हा हॉकी संघटना असे चित्र दिसण्याची शक्यता आहे.