महापौरांच्या राजीनाम्याची शक्यता
By admin | Published: June 4, 2017 01:28 AM2017-06-04T01:28:49+5:302017-06-04T01:28:49+5:30
राष्ट्रवादीत हालचाली : मुश्रीफ दोन दिवसांत घेणार बैठक; ठरविलेला कालावधी ८ जूनला संपणार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महापौर हसिना फरास यांच्या संभाव्य राजीनाम्याबाबत महानगरपालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. फरास यांना सहा महिन्यांचा कार्यकाल ठरवून दिला होता. त्याची मुदत आता ८ जूनला संपत आल्याने या चर्चेला राष्ट्रवादी कॉँग्रेसमधून सुरुवात झाली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ येत्या दोन दिवसांत बैठक घेण्याची शक्यता आहे.
फरास यांची १२ डिसेंबर २०१६ ला महापौरपदी निवड झाली होती. फरास यांच्यासह त्यावेळी अनुराधा खेडकर, माधवी गवंडी यादेखील इच्छुक होत्या. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते आमदार मुश्रीफ यांनी सहा-सहा महिने संधी देण्याचा निर्णय घेतला होता.
हसिना फरास यांना महापौरपदाची प्रथम संधी देताना आमदार मुश्रीफ सांगतील तेव्हा राजीनामा देण्याचे त्यांचे पुत्र आदिल फरास यांच्याकडून मान्य करवून घेण्यात आले.
त्यासाठी प्रा. जयंत पाटील यांनी आमदार मुश्रीफ यांचे मोबाईलवर संभाषण घडवून दिले. विशेष म्हणजे मुश्रीफ यांचे हे बोलणे स्पीकर आॅन करून सर्वांना ऐकविण्यात आले होते. ज्यावेळी मी सांगेन त्यावेळी राजीनामा द्यावा लागेल, हे मुश्रीफ यांनी सर्र्वांच्या साक्षीने आधी फरास यांच्याकडून वदवून घेतले आणि मगच त्यांचा महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आले.
फरास यांचा महापौरपदाचा सहा महिन्यांचा कार्यकाल ८ जूनला संपणार आहे. त्यामुळे त्या राजीनामा केव्हा देणार याकडे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. महापालिका वर्तुळातही तशी चर्चा सुरू झाली आहे. राजीनाम्यानंतर आणखी हालचाली गतिमान होण्याची शक्यता आहे.
महापौरांचा राजीनामा घेण्यासंदर्भात शुक्रवारी सकाळी अकरा वाजता जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत आमदार मुश्रीफ यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीस माजी महापौर आर. के. पोवार, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राजू लाटकर, नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांना बोलाविले होते. तथापि, माजी आमदार बाबूराव धारवाडे यांच्या अंत्ययात्रेमुळे पोवार, लाटकर बैठकीला जाऊ शकले नाहीत. त्यामुळे ही बैठक झाली नाही. येत्या दोन दिवसांत पुन्हा ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.
एक वर्षाचाच कार्यकाल
महापौरपदी निवड झाल्यानंतर जेव्हा मी आमदार हसन मुश्रीफ यांना भेटून त्यांचे आभार मानले, त्यावेळी मुश्रीफ यांनी वर्षभर चांगले काम करा, अशा शब्दांत मला शुभेच्छा दिल्या होत्या. याचा अर्थ मला एक वर्षासाठी संधी दिली आहे, असा होतो, असे महापौर हसिना फरास म्हणाल्या.
इच्छुकांची संख्या अधिक असल्याने सहा-सहा महिने संधी देण्याचा निर्णय घेतला होता.
महापौर राजीनामा केव्हा देणार याकडे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे लक्ष. त्यानंतर इच्छुकांच्या हालचाली गतिमान होणार.