नव्या पदाधिकाऱ्यांच्या निधीत कपात होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:29 AM2021-09-05T04:29:02+5:302021-09-05T04:29:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या माजी सभापती जुन्या निधीसाठी पुन्हा उचल खाल्ली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार नव्या ...

Possibility of reduction of funds for new office bearers | नव्या पदाधिकाऱ्यांच्या निधीत कपात होण्याची शक्यता

नव्या पदाधिकाऱ्यांच्या निधीत कपात होण्याची शक्यता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या माजी सभापती जुन्या निधीसाठी पुन्हा उचल खाल्ली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार नव्या पदाधिकाऱ्यांच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये काही प्रमाणात कपात होण्याची शक्यता आहे. एकदा निधी मंजूर झाल्यानंतर पुन्हा कपात होण्याच्या शक्यता असल्याने सत्तारूढांमध्येच धुसफूस वाढण्याची शक्यता आहे.

मुळात बजरंग पाटील, सतीश पाटील, हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, डॉ. पद्माराणी पाटील, स्वाती सासने यांचे राजीनामे चांगले पाच महिने लांबले. शिवसेनेच्या मुंबईतील वरिष्ठ नेत्यांना चार वेळा त्यासाठी कोल्हापुरात यावे लागले. यानंतर शिवसेेनेने अर्जुन आबिटकर यांच्यावर जबाबदारी देऊन त्यांनी या सभापतींचे राजीनामे घेण्याआधी त्यांच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा प्रश्न मिटवायचा, असे ठरले होते. त्यानुसार आबिटकर यांनी सर्व माजी पदाधिकाऱ्यांसोबत धावपळ करून हा प्रश्न मिटवत आणला आणि त्यानंतर राजीनामे झाले.

जुलै २०२१ मध्ये नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या. त्यानंतर गेल्या पंधरवड्यात झालेल्या सर्वसाधारण सभेआधी अध्यक्ष राहुल पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची भेट घेऊन निधी वितरणाचे सूत्र निश्चित केले. परंतु एवढे झाले तरी अजून या जुन्या पदाधिकाऱ्यांच्या निधीचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागलेला नाही. त्यामुळे या सर्वांनी पालकमंत्री पाटील यांची भेट घेतली होती. आम्हाला दिलेला शब्द पाळला नसल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर पाटील यांनी यात लक्ष घालून विषय संपवा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी अध्यक्ष राहुल पाटील यांना दिल्या. त्यानुसार आता सदस्यांच्या निधीला हात घातला तर पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता असल्याने विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या निधीत थोडी कपात करून जुन्यांची भरपाई करण्याचे सूत्र पुढे आल्याचे समजते.

चौकट

राहुल पाटील, शिंपी यांच्यात अजिंक्यताऱ्यावर चर्चा

आपल्याला डावलले जात असल्याचा आरोप करत अध्यक्षांसह सभापतींना निषेधाचे पत्र देणारे जयवंतराव शिंपी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी हे गैरसमजाचे प्रकरण बारा तासांत संपवून टाकले. सकाळीच पाटील यांनी शिंपी यांना फोन करून कोल्हापूरला येण्याची विनंती केली. त्यानुसार पालकमंत्री पाटील यांच्या कार्यालयात स्वतंत्रपणे पाटील, शिंपी यांच्यात चर्चा झाली. शिक्षक पुरस्कार निवडीसाठी आपण स्वत निरोप दिल्याचे या वेळी अमर पाटील यांनी सांगितले. शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनीही निरोप दिला होता. पुणे येथील पुरस्कार वितरणाला कोरोनामुळे तिघांनाच निमंत्रित केले होते, असे सांगून पाटील यांनी त्यांचे गैरसमज दूर केले. या पुढच्या काळात सर्व बैठकांचे निरोप तुम्हाला मी स्वत: देईन, असेही पाटील यांनी सांगितले.

Web Title: Possibility of reduction of funds for new office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.