नितेश राणेंना वैद्यकीय तपासणीसाठी कोल्हापुरात आणण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 12:29 PM2022-02-05T12:29:48+5:302022-02-05T12:35:22+5:30
न्यायालयाने जामीन अर्ज नाकारल्यास मोठा गोंधळ उडण्याची शक्यता
तानाजी पोवार
कोल्हापूर : शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्लाप्रकरणी न्यायालयीन कोठडीतील संशयित भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज, शनिवारी कणकवली न्यायालयात सुनावणी होत आहे. न्यायालयाने जामीन अर्ज नाकारल्यास मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे त्यांना वैद्यकिय तपासणीसाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दुपारनंतर आणण्यात येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे कोल्हापुरातील कार्यकर्ते सकाळी सीपीआर रुग्णालयात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी धावपळ करत आहेत.
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी संशयित भाजपने आमदार नितेश राणे व त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांची पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्याने त्यांना न्यायालयाने दि. १८ फेब्रुवारीपर्यत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्रकृतीचे कारण पुढे करुन राणे सद्या ओरस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.
दरम्यान, जामीन मिळावा यासाठी नितेश राणे यांच्यावतीने वकीलांनी न्यायालयात अर्ज केला आहे. त्या अर्जावर आज, शनिवारी दुपारी सुनावणी होत आहे. सुनावणीत सरकारी पक्षाचे म्हणणे घेण्याची शक्यता आहे. हे म्हणणे वेळेत सादर न झाल्यास त्या जामीन अर्जाचा निर्णय सोमवारपर्यत प्रलंबीत राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शनिवारी दुपारी न्यायालयात राणे यांचा जामीन मंजूर झाल्यास तेथेच ओरसमध्येच त्यांची वैद्यकिय तपासणी होईल जर जामीन नाकारला तर गोंधळ उडण्याची शक्यता गृहीत धरुन राणे यांना वैद्यकिय तपासणीसाठी दुपारनंतर सीपीआर रुग्णालयात आणण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे कोल्हापूरातील कार्यकर्ते सकाळी सीपीआर रुग्णालयात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी धावपळ करत होते.