कोल्हापूर ‘वंदे भारत’चे संभाव्य वेळापत्रक तयार, सात तासात मुंबईला पोहोचणार; धनंजय महाडिकांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 01:27 PM2023-09-26T13:27:08+5:302023-09-26T13:27:34+5:30
वंदे भारत एक्स्प्रेस कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी वरदान ठरणार
कोल्हापूर : बहुप्रतीक्षेतील कोल्हापूर मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे संभाव्य वेळापत्रक तयार करण्यात आले असून, या प्रवासासाठी फक्त सात तास लागणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
देशभर वंदे भारत एक्स्प्रेसचा बोलबाला सुरू असून, कोल्हापूरला ही सेवा लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे केली होती. ज्या ठिकाणाहून या रेल्वेचे डबे तयार होत आहेत तेथील कामाची गती वाढवण्यात आल्याने कोल्हापूरसाठी लवकरच ही सेवा सुरू होण्याची शक्यता वाढीस लागली आहे.
यातील पुढचा टप्पा म्हणजे या रेल्वे सेवेचे संभाव्य वेळापत्रकच तयार करण्यात आले आहे. त्यानुसार कोल्हापूर मुंबई प्रवासाला सात तास लागणार आहेत. आलिशान आणि वेगवान असणाऱ्या या रेल्वेची कोल्हापूरसाठी मोठी मागणी होत आहे. सह्याद्री एक्स्प्रेस बंद झाल्यानंतर सर्व ताण महालक्ष्मी एक्स्प्रेसवर आला असून, एका दिवसात निवांतपणे मुंबईला जाऊन येण्यासाठी ही वंदे भारत एक्स्प्रेस कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी वरदान ठरणार आहे.
कोल्हापूर मुंबई
- कोल्हापूरहून निघणार पहाटे ५.५०
- मिरज ६.१८
- सांगली ६.३५
- सातारा ७.५५
- पुणे १०.०३
- कल्याण १२.०५
- ठाणे १२.२५
- छ. शिवाजी महाराज टर्मिनस दुपारी १२.५६
मुंबई कोल्हापूर
- छ. शिवाजी महाराज टर्मिनस संध्याकाळी ५.०३
- ठाणे ५.२५
- कल्याण ५.३९
- पुणे ७.५५
- सातारा ९.२५
- सांगली ११.३३
- मिरज ११.४५
- कोल्हापूर ११.५५
रेल्वेचे अधिकारी अशा पद्धतीने वेळापत्रक तयार करत आहेत. या रेल्वेचा ताशी १६० कि.मी. असल्याने हातकणंगले ते मिरज या दरम्यानच्या रेल्वेमार्गाचे मजबुतीकरण आवश्यक आहे. परंतु, येत्या दोन महिन्यात ही सेवा सुरू करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. - धनंजय महाडिक, खासदार