रिक्षाचालकांसाठी आधार-मोबाइल लिंकची पोस्टातर्फे सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:16 AM2021-06-10T04:16:47+5:302021-06-10T04:16:47+5:30
कोल्हापूर : रिक्षाचालकांकरीता आधार कार्डमध्ये दुरुस्ती करण्यासाठी सर्व पोस्ट कार्यालयात सोय करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डाॅ. स्टीव्हन ...
कोल्हापूर : रिक्षाचालकांकरीता आधार कार्डमध्ये दुरुस्ती करण्यासाठी सर्व पोस्ट कार्यालयात सोय करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डाॅ. स्टीव्हन अल्वारीस यांनी बुधवारी दिली. राज्य शासनाने देऊ केलेल्या १५०० रुपयांच्या अनुदानासाठी आधार कार्डला मोबाइल लिंक करण्यात रिक्षाचालकांना अडचणी येत होत्या. ही अडचण अल्वारिस यांनी पुढाकार घेऊन दूर केली.
राज्य शासनाने राज्यातील ७ लाख २० हजार परवानाधारक रिक्षाचालकांना कोरोना काळात मदतीचा हात म्हणून १५०० रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. ते बँक खात्यात जमा होण्यासाठी आधार, परमिट, लायसेन्स आवश्यक आहे. आधार कार्डला मोबाइल क्रमांक लिंक असणे सक्तीचे आहे. अनेक रिक्षाचालकांच्या आधार कार्डमध्ये मोबाइल लिंक नसल्याचे पुढे आले. आधार कार्डमध्ये दुरुस्ती महा-ई-सेवा केंद्र, राष्ट्रीयकृत बँका आदींमध्ये बंद होती. त्यामुळे रिक्षाचालकांना हे अनुदान खात्यात जमा होण्यास व ऑनलाइन अर्ज भरण्यात मोठी अडचण आली. त्यामुळे आतापर्यंत १५ हजार २८७ पैकी ७५०० हजार रिक्षाचालकांना या अनुदानाचा लाभ घेता आला. ही बाब जाणून पोस्ट खात्याचे वरिष्ठ अधीक्षक रूपेश सोनावले यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाने विनंती केली. त्यानुसार पोस्टाच्या सर्व कार्यालयांमध्ये खास रिक्षाचालकांकरीता ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पोस्ट निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी त्यासाठी सहकार्य केले. लवकरच ही सुविधा प्रादेशिक परिवहन कार्यालयातही सुरू केली जाणार आहे. त्याचा लाभ रिक्षाचालकांनी घ्यावा, असे आवाहनही अल्वारीस यांनी केले आहे.