उचा‘पती’मुळे तीन महिन्यांनी नियुक्तीपत्र
By admin | Published: November 30, 2015 11:20 PM2015-11-30T23:20:10+5:302015-12-01T00:13:18+5:30
जिल्हा परिषदेचा कारभार : निम्मे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर मिळाले अकरा शिक्षक; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या एका मुख्य पदाधिकाऱ्यांच्या उचा‘पती’मुळे सहशिक्षक नियुक्तीची पत्रे मिळण्यास तीन महिने विलंब लागल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे. परिषदेच्या उच्च माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजमध्ये आपल्या नातेवाइकांची वर्णी लागावी म्हणून नियुक्तीच्या प्रक्रियेलाच त्यांनी दबाव टाकून ब्रेक लावला होता. मात्र, प्रकरण चव्हाट्यावर आल्यामुळे अखेर २० नोव्हेंबर रोजी ११ शिक्षकांना नियुक्तीची पत्रे दिली आहेत. एका शिक्षकाची नियुक्ती राखीव ठेवली आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे एम. आर. हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज (गडहिंग्जज), परशुराम विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज (गगनबावडा) अशा दोन शाळा चालविल्या जातात. या दोन्ही शाळांची गुणवत्ता चांगली असल्यामुळे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची दरवर्षी झुंबड उडत असते. या दोन्ही शाळांत विनाअनुदानित तुकडीसाठी १२ सहशिक्षकपदे रिक्त होती. त्यासाठी कंत्राटी पद्धतीने २२ जून २०१५ अखेर उमेदवारांचे अर्ज घेण्यात आले. तब्बल ४५ उमेदवारांचे अर्ज आले. बहुतांशी उमेदवारांनी आपलीच वर्णी लागावी म्हणून जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी यांची भेट घेऊन मोर्चेबांधणी केली.
दरम्यान, निवड समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या वशिल्यावर मर्यादा आल्या. जिल्हाधिकारी यांनी कार्यालयात १० सप्टेंबरला मुलाखत घेतली. विविध निकषांद्वारे निवडलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याच्या प्रक्रियेसाठी जिल्हा परिषद शिक्षक विभागाकडे प्रस्ताव गेला. शिक्षण विभागात प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ते पती महाशयांनी आपले वजन वापरण्यास सुरुवात केली. गगनबावडा येथील शाळेत आपले नातेवाईक उमेदवाराची वर्णी लागावी, यासाठी धडपड करू लागले. नातेवाईक उमेदवाराचे नाव प्रतीक्षायादीत असल्याने निवडीच्या यादीतील एका उमेदवारास बाद ठरविण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली.
या संपूर्ण घोळामुळे अन्य निवड झालेल्या ११ उमदेवारांना नियुक्तीपत्र देण्यासही विलंब झाला. दरम्यान, उचा‘पती’चा प्रताप चव्हाट्यावर आला. त्यानंतर त्यांनी काही प्रमाणात अंग काढून घेतले. त्यामुळे शेवटी प्राथमिकच्या प्रशासनाने २० नोव्हेंबरला नियुक्तीपत्र दिले आहे. (प्रतिनिधी)
टेबल बदलाची कारवाई...
प्राथमिक शिक्षण विभागात भरती प्रक्रियेचे काम चालणाऱ्या टेबलवरील लिपिकाने कागदपत्रांची छाननी काटेकोरपणे केली नसल्याचे पुढे आले. निवडीच्या यादीतील एका उमेदवाराच्या शैक्षणिक प्रमाणपत्रात १९८२ आणि १९८३ अशा दोन जन्मतारखा आहेत. याच मुद्द्यावरून निवड यादीतील उमेदवारास बाद ठरवून आपल्या नातेवाइकास नोकरी लावण्याचा प्रयत्न ते पतीराज करीत आहेत; परंतु निवड यादीतील उमेदवारानेही बंड करून उचा‘पती’च्या विरोधात आवाज काढण्याची तयारी सुरू केली आहे. या प्रकरणात कागदपत्रांची छाननी करण्यात कुचराई केलेल्या लिपिकावर टेबलबदलाची कारवाई झाली आहे.
जिल्हाधिकारी निर्णय घेणार..
जन्मतारखेत खाडाखोड केली, खऱ्या जन्मतारखेचा पुरावा दिला नाही, यासंबंधी प्रश्न निर्माण झाल्यामुळे संबंधित शिक्षकाच्या नियुक्तीपत्रासंबंधी जिल्हाधिकारी बैठक घेणार आहेत. बैठकीत कागदपत्रांची छाननी होणार आहे. त्यानंतर जन्मतारखेसंबंधी घोळ निर्माण झालेल्या उमेदवारास नियुक्तीपत्र द्यायचे की पदाधिकाऱ्याच्या पतीच्या नातेवाइकास द्यायचे हा निर्णय होणार आहे.
नियुक्तीपत्र दिलेल्या उमेदवारांची नावे अशी
देवयानी परगावकर, स्वाती चौगुले, अतुल बुरटुकणे, दीपक पाटील (परशुराम, गगनबावडा), जयश्री रेडेकर, विद्याराणी नाईक, भारती कदम, पूनम तळगुळकर, सुप्रिया कोठीवाले, वैशाली साबळे, विनी
फर्नांडिस.