मंत्री पदासाठी ‘पी. एन. - सतेज’ यांचे दिल्लीत लॉबिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 11:09 AM2019-12-23T11:09:17+5:302019-12-23T11:13:02+5:30
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या, मंगळवारी होण्याची शक्यता असल्याने कॉँग्रेसमध्ये जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे. आमदार सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील यांच्यात मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली असून, कार्यकर्त्यांच्या नजरा कॉँग्रेसच्या यादीकडे लागल्या आहेत.
कोल्हापूर : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या, मंगळवारी होण्याची शक्यता असल्याने कॉँग्रेसमध्ये जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे. आमदार सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील यांच्यात मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली असून, कार्यकर्त्यांच्या नजरा कॉँग्रेसच्या यादीकडे लागल्या आहेत.
कॉँग्रेसला १३ मंत्रिपदे मिळणार आहेत, त्यापैकी अगोदरच दोघांना संधी दिली आहे, आता विस्तारात आठ लोकांना संधी दिली जाणार असून, मुंबई, खानदेश, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला न्याय द्यायचा आहे, यामध्ये कोणाची राजकीय ताकद भारी पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापुरात अलिकडील १0-१५ वर्षांत कमालीची पडझड झाली. त्याचा परिणाम २००९ व २०१४ च्या निवडणुकीत दिसला. २०१९ च्या निवडणुकीत पक्षाने दमदार पुनरागमन केले आणि चार आमदार निवडून आले. त्यात अनपेक्षितपणे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने कॉँग्रेस आमदारांसह कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या. मंत्रिपदासाठी सतेज पाटील व पी. एन. पाटील यांनी गेले २०-२२ दिवस जोरदार फिल्डिंग लावली आहे. मुंबई- दिल्ली वाऱ्या सुरू असून, हायकमांडकडे जोरदार लॉबिंग लावले आहे.
भाजपचे फोडाफोडीचे राजकारण सुरू असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी राजीनामा दिल्याने पक्ष अडचणीत आला होता. अडचणीच्या काळात त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी पडली, ती सक्षमपणे सांभाळत चार आमदार निवडून आले.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री म्हणून प्रभावीपणे काम केले. त्यांचे थेट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी संबंध आहेत, त्याचबरोबर डॉ. डी. वाय. पाटील यांचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. त्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
निष्ठावंत नेता म्हणून पी. एन. पाटील यांची ओळख काँग्रेस श्रेष्ठींकडे आहे. त्यात दोनवेळा पराभूत होऊन तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजय खेचून आणला. २००४ ला स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळणार असे वाटत होते; मात्र त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. काँग्रेस निष्ठा, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अमित देशमुख यांच्याबरोबरच गांधी घराण्याशी संबंधित व्यक्तींबरोबर असलेल्या सलोख्याच्या बळावर त्यांनी मंत्रिपदासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसची सहा कॅबिनेट व दोन राज्यमंत्रिपदी शपथ घेणार आहेत. यामध्ये कॅबिनेट म्हणून मराठवाड्यातून अशोक चव्हाण, अमित देशमुख, पश्चिम महाराष्ट्रातून पृथ्वीराज चव्हाण, मुंबई व कोकण विभागातून वर्षा गायकवाड, विदर्भातून विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, अशी सहा कॅबिनेट निश्चित मानली जातात. याशिवाय सुनील केदार, के. सी. पाडवी, विश्वजित कदम, प्रणिती शिंदे यांनीही जोरदार फिल्डिंग लावली आहे; त्यामुळे या लाटेत कोणाची ताकद भारी पडते, त्यांच्याच पदरात मंत्रिपद पडणार आहे.
मुश्रीफ यांना ‘ग्रामविकास’ खाते
आमदार हसन मुश्रीफ यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्री म्हणून नाव निश्चित झाले आहे. त्यांच्यावर सहकार किंवा ग्रामविकास खात्याची जबाबदारी सोपवली जाणार अशी चर्चा होती; मात्र ‘ग्रामविकास’ खाते मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
‘विधानपरिषद’ ‘सतेज’ यांच्यासाठी अडसर
विधानपरिषदेच्या सदस्यांना मंत्रिपद द्यायचे नाही, असा एक मतप्रवाह कॉँग्रेस श्रेष्ठींमध्ये आहे. हेच सतेज पाटील यांच्यासाठी अडसर ठरत असून, त्यामुळेच ‘पी. एन.’ यांचे नाव शनिवार (दि. २१)पासून आघाडीवर राहिले आहे.