टपालपेट्या ठरल्या नाममात्र
By admin | Published: May 26, 2015 11:37 PM2015-05-26T23:37:16+5:302015-05-27T01:02:52+5:30
पत्रांची पाटी कोरी : माहिती-तंत्रज्ञानामुळे जग जवळ
मेहरून नाकाडे - रत्नागिरी -लॉर्ड डलहौसीने पोस्टाची संकल्पना सुरू केली आणि इंग्रजांच्या राजवटीत पोस्टाचे व्यवहार सुरू झाले. पत्र, तार कालांतराने मनिआॅर्डर व स्पीड पोस्ट सुरू झाले. पत्राने बहुतेक वेळा खुशाली कळत असे. परंतु काळाच्या ओघात पोस्टाच्या काही सुविधा वगळल्या, तर पत्र पाठवण्याची प्रक्रिया फारच मंदावली आहे. इंटरनेटमुळे जगाला गती आली आहे आणि जग इतके जवळ आले आहे की, सातासमुद्रापलिकडची माहिती काही क्षणात उपलब्ध होते. त्यामुळे पत्र सांभाळणाऱ्या टपालपेट्या आता नाममात्र ठरल्या आहेत.
रत्नागिरीत १९३८ला पहिले पोस्ट कार्यालय सुरू झाले. जिल्ह्यात ८० मुख्य डाकघर, तर ५८५ उपडाकघर शाखा आहेत. पत्रवहन करणाऱ्या २२०० टपालपेट्या असून, ८८६ पोस्टमन आहेत. भारतातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आता पोस्ट खातेही हायटेक झाले आहे. स्पीडपोस्ट, कॅश आॅन डिलिव्हरी, बल्क मेल, रजिस्टर्ड सेवा मनिआॅर्डरलाही आधुनिक रूपडे लाभले आहे.
वेगवान स्पर्धेच्या युगात आता मनिआॅर्डर सेवाही ई - मनिआॅर्डर, वेस्ट युनियन मनिआॅर्डर, इन्स्टंट मनिआॅर्डरबरोबर मोबाईल मनिआॅर्डर सेवा सुरू केली आहे.
साहजिकच आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पोस्ट कालबाह्य ठरू लागल्याची ओरड होत असली तरी तंत्रज्ञानाचाच आविष्कार असलेल्या टपालसेवेने व्यावसायिकतेतही यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. संदेश पोहोचवण्यासाठी आंतरदेशीय किंवा पोस्टकार्डव्दारे खुशाली कळवण्यात येत असे. हजारो पत्रांचा बटवडा टपालपेट्यांमधून होत असे. मात्र, इंटरनेटमुळे पत्रापेक्षा जास्त एसएमएस, सोशल मीडिया उपयुक्त ठरत आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात टपालपेट्यांचा वापर फारसा होत नाही.
पत्रव्यवहार कमी झाले तरी दूरध्वनीबील वितरणसुविधा मात्र पोस्टाव्दारे होत आहे. शिवाय आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी टपालखात्याने ‘ई’ मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांशी करार केला आहे. त्या करारातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे पोस्ट खात्याला थोडासा का होईना हातभार लागला आहे.
एकूणच पत्रव्यवहार कमी झाला तरी टपालखाते आता ई मार्केटिंग व्यवसायाकडे वळले आहे. त्यामुळे गावोगावी नाक्यानाक्यावर असलेल्या तांबड्या रंगाच्या टपालपेट्यांचा वापर अल्प होत आहे.
कंपन्यांकडून रजिस्टर्ड पत्र पाठविणे सुरू असले तरी रजिस्टर्ड पत्र पाठविण्यासाठी पोस्टात जावे लागते. त्यामुळे टपालपेट्यांचा वापर होत नाही. ई-मेल, सोशल मिडिया, मोबाइलच्या गराड्यात टपालपेट्या पत्राच्या प्रतीक्षेत दिसून येत आहेत.
आॅनलाईन शॉपिंगशी पोस्टाची गट्टी
स्नॅपडील, अॅमेझॉन, मॅफटॉल सारख्या दहा कंपन्यांशी टायप केल्यामुळे टपालखात्याला गतवर्षी ५०० कोटीचा महसूल प्राप्त झाला होता. आता आॅनलाईन खरेदीचा फंडा वाढला आहे. घरबसल्या लोक वस्तूंचे बुकींग करीत आहेत. या वस्तूंचे वितरण मात्र टपालखात्यातर्फे सुरू आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांलाही त्याच्या आवडीची वस्तू टपालखात्यामुळे घरपोच मिळू लागली आहे. टपाल खात्याचे रत्नागिरीमध्ये बुकींग सेंटर नसले तरी वितरण व्यवस्था मात्र अचूक करण्यात येत आहे. मोबाईल, कपडे, आर्टीफिशियल ज्वेलरी, भांडी तसेच अनेक विविध वस्तूंचे वितरण सुरू आहे. आॅनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढल्यामुळे यावर्षी टपाल खात्याला एक हजार कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. थोडक्यात आता पोस्टानेही ई-खरेदीला आपल्या पध्दतीने हातभार लावण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येते.