टपाल विभागाची आता कोल्हापूरातून नोडल डिलिव्हरी सर्व्हिस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 06:48 PM2020-10-13T18:48:15+5:302020-10-13T18:55:56+5:30
दीडशे वर्षाची परंपरा लाभलेल्या टपाल विभागामार्फत राष्ट्रीय टपाल सप्ताह सोहळ्यानिमित्त कोल्हापूरात आता नोडल डिलिव्हरी सर्व्हिस सुरु करण्यात येत आहे. या सेवेचा प्रारंभ कोल्हापूर, गोवा विभागाचे पोस्ट मास्टर जनरल डॉ. एन. विनोदकुमार यांच्या उपस्थितीत गुरुवारी होत आहे. याशिवाय त्यांच्या हस्ते बुधवारी पन्हाळा येथील पोस्ट आॅफिसच्या नूतन जागेचा कोनशिला समारंभही होत आहे.
कोल्हापूर : दीडशे वर्षाची परंपरा लाभलेल्या टपाल विभागामार्फत राष्ट्रीय टपाल सप्ताह सोहळ्यानिमित्त कोल्हापूरात आता नोडल डिलिव्हरी सर्व्हिस सुरु करण्यात येत आहे. या सेवेचा प्रारंभ कोल्हापूर, गोवा विभागाचे पोस्ट मास्टर जनरल डॉ. एन. विनोदकुमार यांच्या उपस्थितीत गुरुवारी होत आहे. याशिवाय त्यांच्या हस्ते बुधवारी पन्हाळा येथील पोस्ट आॅफिसच्या नूतन जागेचा कोनशिला समारंभही होत आहे.
कोल्हापूरातील टपाल कार्यालयामार्फत राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यापार्श्वभूमीवर हेरिटेज वास्तू असलेल्या कोल्हापूरातील सर्वात जुन्या टपाल कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. रमण मळा येथील सध्याच्या विभागीय टपाल कार्यालयाच्या पिछाडीस असलेल्या या हेरिटेज वास्तूमध्ये टपाल विभागाची नोडल डिलिव्हरी सेवेचा प्रारंभ होत आहे. याचवेळी टपाल विभागाच्या वाहनांसाठीच्या पार्किंग शेडचेही उद्घाटन ते करणार आहेत.
कोल्हापूर, गोवा विभागाचे पोस्ट मास्टर जनरल डॉ. एन. विनोदकुमार कोल्हापूर जिल्ह्याच्या चार दिवसांच्या दौऱ्यात विविध टपाल कार्यालयांना भेटी देणार यामध्ये कागल येथील पंचतारांकित वसाहतीतील आणि यळगूड येथील टपाल कार्यालयांचा समावेश आहे. पांचगाव येथील टपाल कार्यालयाचेही नूतनीकरण ते करणार आहेत.याशिवाय कोविड १९ कालावधीत चांगले काम करणाºया टपाल विभागातील कर्मचाऱ्यांचाही सत्कार पोस्ट मास्टर जनरल यांच्या हस्ते होणार आहे.
पन्हाळा येथे बुधवारी कोनशिला समारंभ
जागेचा वाद असल्यामुळे स्वत:ची जमिन असूनही पन्हाळा येथील टपाल कार्यालय गेली कित्येक वर्षे भाड्याच्या जागेत कार्यरत आहे. आता हा वाद मिटल्याने आठवडी बाजाराला लागून असलेल्या स्वत:च्या मालकीच्या जागेत हे टपाल कार्यालय उभे राहणार आहे. या जागेत उभा राहणाऱ्या टपाल कार्यालयाच्या कोनशिला समारंभ बुधवारी सायंकाळी ४ वाजता पन्हाळा येथे होणार आहे.