टपाल तिकिटावर छापा स्वत:चे चित्र !
By admin | Published: October 22, 2015 12:34 AM2015-10-22T00:34:30+5:302015-10-22T00:54:15+5:30
जयसिंगपूर पोस्ट कार्यालयाकडून सुविधा
जयसिंगपूर : जयसिंगपूर पोस्ट कार्यालयाने स्वत:चे छायाचित्र व आवडीची रचना असलेले टपाल तिकीट छापून घेण्याची संधी देऊन शहरवासियासाठी नवीन उपक्रम राबविला आहे. तसेच या विभागाच्यावतीने ‘माय स्टॅँम्प’ ही योजना सुरू केल्यामुळे अशी सुविधा देणारी जयसिंगपूर पोस्ट जिल्ह्यातील एकमेव कार्यालय आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष सुनील पाटील-मजलेकर यांनी केले.
जागतिक टपाल दिनानिमित्त भारतीय टपाल विभागांतर्गत राष्ट्रीय टपाल सप्ताह निमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जयसिंगपूर पोस्ट कार्यालयात ‘माय स्टॅम्प’ या नावीन्यपूर्ण योजनेचा प्रारंभ नगराध्यक्ष मजलेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डाक अधीक्षक रमेश पाटील होते.
प्रारंभी पोस्टमास्तर एम. बी. सिदनुर्ले यांनी योजनेची माहिती दिली. ‘माय स्टॅँम्प’मध्ये जयसिंगपूर परिसरातील नागरिकांना आता आपली ‘इमेज’ टपाल तिकिटावर झळकविण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे. तसेच आपणाला हवे असणारी रचनाही वापरता येणार आहे. ग्राहकांना आपल्या छायाचित्राचे टपाल तिकीट बनवून मिळणार आहे. राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे निमित्त साधून काही काळ हा उपक्रम सुरू राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी टपाल तिकीट संग्राहक डॉ. सुनील पाटील यांनी संकलित केलेल्या अत्यंत दुर्मीळ व ऐतिहासिक टफाल तिकिटांचे एक दिवसीय प्रदर्शन भरविण्यात आले होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष आण्णासाहेब दानोळे, उद्योगपती अशोक कोळेकर, डॉ. महावीर अक्कोळे, डॉ. नलिनी पाटील, राज धुदाट, नंदकुमार गायकवाड यांच्यासह नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)